मुझफ्फराबाद : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात ‘ऑनर किलिंग’चा संशयित प्रकार समोर आला आहे. येथे एका 17 वर्षीय मुलीला तिच्या वडिलांनी आणि अल्पवयीन भावाने कथितरित्या गोळ्या घालून ठार केले. ही घटना रविवारी सायंकाळी कांधला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबहेटा गावात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान नावाच्या 12 वीत शिकणार्या मुलीला वडील जुल्फाम आणि 15 वर्षीय भावाने घरात वरच्या मजल्यावर नेले आणि पिस्तुलाने तिची हत्या केली. जुल्फामने कुटुंबाचे नाव खराब केल्यामुळे मुलीला मारल्याची कबुली दिली आहे. जुल्फाम आणि त्याच्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुस्कानचे गावातील मुलाशी प्रेमसंबंध होते, ज्याला कुटुंबाचा विरोध होता. रविवारी वडिलांनी तिला फोनवर बोलताना पाहिले, ज्यामुळे हा प्रकार घडला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.