

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर आफ्रिकेतील लीबिया या देशात एक लिटर पेट्रोलची किंमत केवळ अडीच रुपये आहे. या यादीत इराण दुसर्या स्थानी असून, भारत 21 व्या क्रमांकावर आहे.
जागतिक भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वर-खाली होत आहेत. भारतातही त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर दिसून येत आहे. सध्या आपण रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करत असून, आपल्याला एकूण गरजेच्या सुमारे 85 टक्के तेल आयात करावे लागते.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगभरातील विविध देशांमधील पेट्रोलच्या किमतींची आकडेवारीवर नुकतीच जारी केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार लीबियानंतर, इराण दुसर्या क्रमांकावर आहे. तेथे तेलाची किंमत 2.54 रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर व्हेनेझुएलाचा क्रमांक लागतो आणि त्या देशात 1 लिटर पेट्रोलसाठी 3.07 रुपये मोजावे लागतात. व्हेनेझुएलानंतर कुवेत, अल्जेरिया, इजिप्त, कझाकिस्तान, नायजेरिया, सौदी अरेबिया आणि युएई यांचा क्रमांक लागतो. या यादीमध्ये भारत 21 व्या क्रमांकावर आहे.
इराण आणि व्हेनझुएला स्वस्त तेलासाठी ओळखले जात असले, तरी लीबियाने या दोन्ही देशांना मागे टाकले आहे. लीबियामध्ये तेलाचे प्रचंड साठे आहेत. या देशाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे. त्याच्या पूर्वेला इजिप्त, पश्चिमेला ट्युनिशिया व अल्जेरिया, तर दक्षिणेला नायजर, चाड आणि सुदान हे देश आहेत.