जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्स्थापित होणार? मुख्यमंत्री ओमर म्हणाले, "नरेंद्र मोदी सरकार..."
पुढारी ऑनलाईन डेस्क : जोपर्यंत केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणता शक्यता नाही, असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे ओमर अब्दुल्ला यांनी स्वीकारल्यानंतर त्यांचे केंद्र सरकारशी असलेले संबंध अधिक जवळचे झाल्याचे मानले जाते आहे. मात्र केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर त्यांचे सरकार केंद्रासोबतच्या संबंधांचे पुनर्मूल्यांकन करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ( article 370 in jammu and kashmir )
'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत ओमर यांना सवाल करण्यात आली की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत तोपर्यंत जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० पुनर्संचयित होण्याची शक्यता आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले की, जोपर्यंत दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे तेपर्यंत जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० पुनर्संचयित केले जाणार नाही.
केंद्रासोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे
आमच्या सरकारने पहिल्या काही महिन्यांत केंद्रासोबत सहयोगात्मक संबंध प्रस्थापित करणे महत्त्वाचे होते.माझ्या सरकारच्या पहिल्या काही महिन्यांत तरी मी जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी केंद्र सरकारशी चांगले कामकाजाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर ती आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर आम्ही पुनर्मूल्यांकनाचा विचार करु शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करण्यावर सध्या भाष्य नाही
आम्ही जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा पुनर्संचयित करण्याची आणि संवैधानिक हमी पुनर्संचयित करण्याची मागणी करणारा ठराव विधानसभेत मंजूर केलाआहे. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत कलम ३७० पुनर्संचयित करणे शक्य नाही. ते भारत सरकारला पाकिस्तानशी संबंध प्रस्थापित करण्याचा सल्ला देण्याचा विचार करत आहेत का? या प्रश्नावर सध्या तरी शक्य नाही, असेही ओमर अब्दुला यांनी सांगितले.
