

Odisha woman Courage : ओडिसा येथील एका महिलेच्या धाडसाचे कौतुक होत आहे. आपल्याला जरी कोणताही साप दिसला तर चार हात लांब पळून जातो. तो विषारी असो व नसो. पण या महिलेने मात्र दंश केल्या अतिजहाल घोणसाला पकडून चक्क बरणीत भरले व थेट रुग्णालय गाठले. तिच्या या धाडसामुळे कोणता साप चावला आहे हे लक्षात आल्याने तिच्यावर योग्य उपचार करता आले. यामुळे ती महिला आता धोक्याबाहेर आहे. पण तिच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की ओडिसातील मलकानगिरीच्या माथिली भागातील करुमपली गावात ही घटना घडली. मणिमा नायक नावाच्या एका आदिवासी महिलेला घोणस जातीचा (Russell’s Viper) साप चावला. तिने क्षणाचाही विलंब न करता तिला चावलेला विषारी साप एका प्लास्टिकच्या डब्यात घालून रुग्णालयात नेला. यामुळे डॉक्टरांना सापाची जात ओळखणे आणि विलंब न करता योग्य उपचार सुरू करणे शक्य झाले.
कुरमपली गावातील ३८ वर्षीय मणिमा नायक यांना बुधवारी २४ जून रोजी अंधारात जात असताना घोणसाने दंश केला. घाबरून न जाता, त्यांनी शांतपणे त्या सापाला एका रिकाम्या बिस्किटांच्या प्लास्टिक डब्यात पकडले आणि त्यानंतर आपल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून माथिली येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मलकानगिरी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात (DHH) हलवण्यात आले, जिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्या धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बाबत त्यांनी सांगितले की, रात्री चुकून सापावर पाय पडल्यामुळे दंश झाला. त्या म्हणाल्या, ‘मी आधी माथिली रुग्णालयात गेले होते आणि नंतर मला जिल्हा रुग्णालयात (DHH) पाठवण्यात आले. जरी माझ्या पायावर अजूनही सूज असली, तरी आता मला बरे वाटत आहे.’
यावर जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रफुल्ल कुमार बेहरा म्हणाले, ‘सापाचे विष निष्प्रभ करण्यात आले आहे आणि आता शरीरात विष पसरल्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र, ज्या ठिकाणी दंश झाला होता तिथे संसर्ग झाला आहे, त्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया विभागात हलवण्यात आले आहे. जखम बरी होण्यासाठी अजून दोन आठवडे लागतील असे त्यांनी सांगितले.डॉ. बेहरा यांनी मणिमाच्या प्रसंगावधानाचे कौतुक केले आणि सांगितले की, साप रुग्णालयात आणल्यामुळे डॉक्टरांना त्याची जात त्वरित ओळखता आली आणि विलंब न करता योग्य उपचार सुरू करता आले.
घोणसाचे विष अतिजहाल
'स्नेक हेल्पलाइन'चे संस्थापक शुभेंदू मल्लिक यांनी सांगितले की, घोणस (Russell’s viper) हा भारतातील अत्यंत विषारी सापांपैकी एक असून, सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंमागे या सापाचा मोठा वाटा असतो. मनिमाच्या धैर्याचे कौतुक करतानाच, त्यांनी लोकांना दंशानंतर साप पकडण्याचा प्रयत्न न करण्याचा इशाराही दिला.