पुढारी ऑनलाईन डेस्क:
या महिन्यामध्ये समोर आलेल्या जिएसटी कलेक्शनमध्ये जवळपास 9 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारी वरुन समोर आले आहे. एकूण 1.87 लाख कोटी इतका महसूल जिएसटीच्या रुपात गोळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज (1 नोव्हेंबर) जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंबधी वृत्त दिले आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबर 2023 मध्ये जिएसटी कलेक्शनचा आकडा 1.72 लाख कोटी होता यंदा त्यामध्ये 8.9 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. व्यापारवृद्धी व लोकांची वाढलेली क्रयशक्ती यामुळे व्यवहारांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे परिणामी सिजिएसटी, एसजिएसटी, आयजिएसटी व सेस कर यांच्यारुपाने जमा होणारी रक्कम दरवर्षी वाढत आहे.
2023 व 2024 या वर्षांची तुलनात्मक आकडेवारी पाहिली तर यामध्ये वाढ झाली आहे. 2023 मध्ये 11.64 लाख कोटी इतकी रक्कम जमा झाली होती तर यंदा 12.74 लाख कोटी जिएसटी जमा झाला आहे. मोदी सरकारच्या पहिल्या सत्ताकाळात 1 जुलै 2017 रोजी देशभरात जिएसटी (गुडस् ॲन्ड सर्व्हिस टॅक्स ) करप्रणाली लागू करण्यात आली. देशाची करप्रणली अधिक सुटसुटीत व्हावी व अनेक प्रकारच्या छुप्या करांमधून व्यापारी ग्राहक यांना भुर्दंड बसू नये तसेच करप्रणालीमध्ये पारदर्शकत यावी यासाठी ही करप्रणाली देशभरात लागू करण्यात आली.
रोजच्या वापरातील वस्तू जशा की तेल, शांपू, साबण, टूथपेस्ट, गहू, भात, दूध दही इत्यांदीवरील जिएसटी हळू हळू कमी करत आणली आहे. तर काही जिवनावश्यक वस्तूंवरील जिएसटी पूर्णपणे माफ करण्यात आली आहे. जिएसटी परिषद व अर्थमंत्रालय वेळोवळी या जिएसटीच्या दरांमध्ये फेरबदल करत असते. जिएसटी करप्रणालीमूळे दरवर्षी भारताची आर्थिक प्रगती होत असल्याचे दिसून येत आहे.