

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. सुनावणी सुरू असताना अचानक अश्लील व्हिडीओ स्क्रीनवर दिसू लागला. या घटनेमुळे न्यायालयाची कार्यवाही त्काळ थांबवावी लागली. ही घटना दुपारी सुमारे १२:५६ वाजता घडली. त्या वेळी मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस करिरा यांच्या खंडपीठासमोर विविध जनहित याचिकांवर सुनावणी सुरु होती.
‘क्षितिजीत सिंह’ नावाने लॉगिन केलेल्या युजरकडून व्हिडीओ चालवला गेला. त्यानंतर स्क्रीनवर “तुमचा सिस्टम हॅक झाला आहे” असा संदेश दाखवण्यात आला. तिसऱ्यांदा म्युझिक वाजवून सुनावणीत अडथळा आणला गेला. या सततच्या व्यत्ययानंतर मुख्य न्यायाधीशांनी संपूर्ण व्हर्च्युअल कार्यवाही बंद करण्याचा निर्णय घेतला.
या विचित्र आणि अडथळा निर्माण करणाऱ्या घटनेमुळे ऑनलाइन सुनावण्यांशी संबंधित धोक्याकडे लक्ष वेधले गेले आहे. विशेषतः जेव्हा अनधिकृत व्यक्तींना सहजपणे प्रवेश मिळू शकतो. दुसऱ्या व्यत्ययानंतर व्हर्च्युअल कोर्टाची सुनावणी पूर्णपणे बंद करण्यात आली असून ती अद्याप पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. या घटनेनंतर VC प्रणाली नेमकी केव्हा पुन्हा सुरू होईल, याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही.