

बंगळूर : मुख्यमंत्री पदावर पाच वर्षे मीच राहणार, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यासंदर्भातील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आता राज्य काँग्रेस प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनाच बदलण्याचा प्रयत्न राजकीय वर्तुळात होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
सुरुवातीपासूनच सुरजेवाला यांच्या कामगिरीवर नाराज असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता त्यांच्या निकटवर्तीयांच्या माध्यमातून सुरजेवाला यांना बाजूला करण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नेतृत्व बदलाबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चेचे कारण सुरजेवाला आहेत. बंगळूरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रत्येक काँग्रेस आमदारांशी वैयक्तिकरीत्या बोलून निधी वाटपावरून आमदारांमध्ये असलेल्या मतभेदांवर आणि काही मंत्र्यांवर लक्ष केंद्रित करून गोंधळ निर्माण केला, असल्याचे म्हटले जात आहे.
सरकारच्या कामगिरीबद्दल आणि मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल आमदारांचे मत विचारून अनावश्यक गोंधळ निर्माण केला आहे. त्याचवेळी राज्यातील नेतृत्वात बदल व्हायला हवा का, मुख्यमंत्री बदलल्यास त्यांची भूमिका काय असेल, असे प्रश्न आमदारांना विचारल्याचा आरोप सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांनी केले आहेत. सरकार अस्तित्वात आल्यापासून सुरजेवाला विविध कारणांसाठी अनावश्यक हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळेच त्यांच्या जागी सरकार आणि पक्षामध्ये समन्वय साधून पक्ष संघटनेसाठी कठोर परिश्रम करणार्या व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विनंती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सुरजेवाला यांच्या कामगिरीवर उघडपणे नाराजी व्यक्त करणारे सहकार मंत्री के. एन. राजण्णा पत्रकारांशी बोलताना म्हणाले, प्रदेश काँग्रेस प्रभारी म्हणून ते ज्या पद्धतीने वागत आहेत त्यामुळे गोंधळ निर्माण होत आहे. आमदार नाराज आहेत, असे कारण देऊन सुरजेवाला यांनी राज्याला भेट देणे आणि मते गोळा करणे सामान्य नाही. त्यांनी केलेल्या प्रक्रियेवर मी समाधानी नाही.
पक्षाने मला संघटन आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. माझे लक्ष फक्त पक्ष आणि सरकारच्या हिताचे रक्षण करण्यावर आहे, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. दिल्लीहून परतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी मी पार पाडत राहीन. दिल्ली भेटीदरम्यान आम्ही सुरजेवाला वगळता इतर कोणत्याही नेत्यांना भेटलो नाही. सर्व आमदारांनी त्यांचे मत सुरजेवाला यांना सादर केले आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवर पक्ष संघटनेत कठोर परिश्रम घेतलेल्यांना आम्ही दिलेल्या आश्वासनानुसार पद देणे आवश्यक आहे.
प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली आहे. बंगळूर येथे ते पत्रकारांशी बोेलत होते. ते म्हणाले, केपीसीसी अध्यक्ष पद बदलले पाहिजेत. आम्ही हे अनेकवेळा सांगितले आहे. ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. हायकमांड सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. हायकमांड नेते योग्य निर्णय घेतील.