

नवी दिल्ली : उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता सहायक प्राध्यापक होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच 'यूजीसी'ची नेट परीक्षा उत्तीर्ण होण्याची गरज नाही. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी, उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक भरती आणि पदोन्नतीसाठी 'यूजीसी'ने मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. त्यानुसार सहायक प्राध्यापक भरतीसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक नाही.
मसुदा मार्गदर्शक तत्त्वे 'यूजीसी'च्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहेत. तज्ज्ञांचे अभिप्राय आणि सूचना घेतल्यानंतर ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाणार आहेत. 'यूजीसी'कडून ५ फेब्रुवारीनंतर मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाण्याची शक्यता आहे. सध्या लागू असलेली मार्गदर्शक तत्त्वे २०१८ नुसार, सहायक प्राध्यापक भरतीसाठी, उमेदवाराने ज्या विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे, त्याच विषयात नेट पात्र असणे आवश्यक आहे. आता नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, उमेदवारांना इतर विषयांमधून नेट करण्याचे स्वातंत्र्य आहे. तसेच, नेटशिवाय, थेट पीएच.डी. केलेले उमेदवारही सहायक प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करू शकतील.
मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, उच्च शिक्षण संस्थेत कुलगुरू होण्यासाठी उमेदवाराला १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक नाही. ज्यांना वरिष्ठ स्तरावर दहा वर्षांच्या कामाचा अनुभव आहे, ते कुलगुरू होऊ शकतात. उच्च शिक्षणात स्वातंत्र्य आणि लवचिकता वाढविणे हा यामागील हेतू असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी म्हटले आहे.