नवी दिल्ली : चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूचा संसर्ग पसरत आहे. त्याची लक्षणेही कोरोना विषाणूसारखी आहेत. या नवीन विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) आहे. जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोरोनासारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. भारताने मात्र या प्रकरणाबाबत काळजी करण्याची गरज नाही, असे आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल म्हणाले.
चीनमध्ये वाढत असलेल्या एचएमपीव्ही विषाणूबाबत बोलताना आरोग्य सेवा महासंचालक अतुल गोयल म्हणाले की, याबद्दल भारताने काळजी करण्याची गरज नाही. चीनमध्ये मेटापन्यूमोव्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. मात्र चीनमध्ये मेटापन्यूमोव्हायरस हा एक सामान्य विषाणू आहे. यामुळे सर्दीसारखा आजार होते किंवा काही लोकांमध्ये फ्लू सारखी लक्षणे असू शकतात. विशेषत: वृद्ध आणि १ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये ही लक्षणे असू शकतात. मात्र त्याची काळजी करावी एवढा हा विषाणु गंभीर नाही. श्वासोच्छवासातील विषाणू संसर्ग हिवाळ्यात होतात. आमची रुग्णालये आणि संस्था हे हाताळण्यासाठी तयार आहेत. बेड आणि ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता आहे. तसेच त्याला कोणत्याही विशिष्ट औषधांची आवश्यकता नाही कारण त्याच्या विरूद्ध कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल औषध नाही, असेही ते म्हणाले.