

नवी दिल्ली : अजित पवार यांच्या जाण्याचे दुःख संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंबप्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर असून ती आपण पार पाडत आहोत. संपूर्ण कुटुंब एक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. बारामती निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याबाबत विचारले असता बारामतीत माझ्याशी कोणी बोलले नाही, मीही कोणाशी बोललो नाही, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून संवाद साधला गेला नाही, याबद्दल सूचक वक्तव्य केले.
आम्ही सध्या विरोधी पक्षात आहोत. आमची भूमिका त्यानुसार असेल, असे ते म्हणाले, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीत माध्यमांशी सविस्तर संवाद साधला. संजय राऊत, पार्थ पवार यांनी यांनी केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, राजकारणात परिपक्वता असणे आवश्यक आहे. काँग्रेस किंवा इतर पक्षांनी काय करावे हे त्यांचे निर्णय आहेत. तसेच महायुतीने त्यांच्या बॅनरवर माझा फोटो लावला असेल तर ते चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, कोणत्याही पक्षाला उमेदवार देण्याचा पूर्ण अधिकार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा ठेवण्याचे कारण नाही. बारामतीतील निकालाबाबत विचारले असता, मी ज्योतिषी नाही, असे म्हणत त्यांनी स्पष्ट हसत प्रतिक्रिया देणे टाळले.
अपघाताबाबत माझ्याकडे अधिकृत माहिती नाही
अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, रोहित पवार यांनी अभ्यास केला होता म्हणून ते बोलत आहेत. माझ्याकडे त्या संदर्भात अधिकृत माहिती नाही. सकाळी नऊच्या सुमारास अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या बाजूला कोसळले आणि अपघात झाला. त्यानंतर मी त्याच ठिकाणी मी हेलिकॉप्टरने गेलो आणि लँड झालो. अजित पवारांचा अपघात हा अपघात असावा असे माझे प्राथमिक मत आहे. मात्र रोहित यांनी आरोप करताना काही अभ्यास केला आहे म्हणून ते बोलत आहेत.
राज्यातील बाबा संस्कृती चिंताजनक
राज्यात वाढत असलेल्या तथाकथित ‘बाबा’ संस्कृतीवरही पवारांनी चिंता व्यक्त केली. मी पंढरपूर, कोल्हापूर येथे दर्शनासाठी जातो. मात्र त्याची जाहिरात करत नाही. आजकाल नेते एका बाजूला शिव - फुले - शाहू - आंबेडकर म्हणतात आणि दुसरीकडे अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देतात, हे चिंताजनक आहे, असे त्यांनी नमूद केले.