

नवी दिल्ली : कोरोना लसीकरण आणि तरुणांमधील अचानक मृत्यू यांच्यात कोणताही वैज्ञानिक संबंध नसल्याचा निष्कर्ष नवी दिल्लीतील ‘एम्स’ने केलेल्या एका वर्षभराच्या अभ्यासातून समोर आला आहे.
‘तरुण, प्रौढांमधील अचानक मृत्यूंचा भार : भारतातील तृतीयस्तरीय रुग्णालयांतील एक वर्षाचा निरीक्षणात्मक अभ्यास’ हा संशोधन लेख ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. 18 ते 45 वयोगटातील अचानक मृत्यूंची प्रकरणे व्हर्बल ऑटॉप्सी, पोस्टमार्टेम इमेजिंग, पारंपरिक शवविच्छेदन आणि सूक्ष्म तपासणीतून अभ्यासण्यात आली. लसीकरण स्थिती आणि अचानक मृत्यू यांच्यात कोणताही सांख्यिकीयदृष्ट्या महत्त्वाचा संबंध आढळला नाही.
बहुतांश मृत्यू हृदयविकारांसारख्या आधीपासून असलेल्या आजारांमुळे झाल्याचे आढळले. श्वसनविकार आणि इतर कारणेही काही प्रकरणांत नोंदली गेली. ‘एम्स’चे प्रा. डॉ. सुधीर अरावा यांनी अफवांपासून दूर राहून वैज्ञानिक माहितीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे.