Nitish Kumar : मुख्यमंत्रिपदासाठी नितीश कुमारांचे नाव निश्चित
नवी दिल्ली ः बिहारमध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये सध्याची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपल्या राजीनाम्यासह नितीश कुमार यांनी हा प्रस्ताव राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांना सादर केला. 19 नोव्हेंबर रोजी विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
नितीश कुमार यांची ‘एनडीए’ नेते म्हणून निवड निश्चित आहे. 20 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानात होणाऱ्या विशेष सोहळ्यात ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्यासाठी गांधी मैदानावर तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी, जेडीयू आणि भाजप विधिमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका होतील. त्यानंतर विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी ‘एनडीए’ची बैठक होईल.
शपथविधीला पंतप्रधान, शहा, फडणवीस येणार
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
विरोधी पक्षनेतेपदी तेजस्वी यादव
पाटणा ः बिहार विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजदचे तेजस्वी यादव यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षाच्या आमदारांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

