

नवी दिल्ली : पश्चिम आशियाई देशातील संकटामुळे देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताला येत्या काळात 100 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या ग्रीन ट्रान्सपोर्ट परिषदेत ते बोलत होते. गडकरी म्हणाले, सध्या भारतीय वाहने ई-20 पेट्रोलवर चालू शकतात. मात्र गंज चढणे आणि इतर समस्या टाळण्यासाठी इंजिनमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक असते. ब्राझीलसारख्या देशांमध्ये 100 टक्के इथेनॉल मिश्रण केले जाते. भारताला आपली कच्च्या तेलाची भूक भागविण्यासाठी 87 टक्के आयातीवर अवलंबून राहावे लागते. जीवाश्म इंधनाच्या आयातीसाठी आपण 22 लाख कोटी रुपये खर्च करतो.
जीवाश्म इंधनामुळे प्रदूषणही वाढत आहे. म्हणूनच देशाला पर्यायी इंधन आणि जैवइंधनाचे उत्पादन वाढवण्यावर काम करणे गरजेचे आहे. पेट्रोल व डिझेल वाहनांचा वापर कमी करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. परंतु आपण लोकांना पेट्रोल आणि डिझेल वाहने खरेदी करणे थांबवण्यास भाग पाडू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असल्याचे नमूद करत गडकरी म्हणाले की, हायड्रोजन इंधन स्टेशनच्या संचालनाचा खर्च कमी करण्याची गरज आहे. तसे शक्य झाल्यास हायड्रोजन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरेल. हायड्रोजन इंधनाची वाहतूक करणे ही एक समस्या आहे. तसेच, भारताला ऊर्जेचा निर्यातदार बनवण्यासाठी, आपल्याला 1 किलो हायड्रोजन केवळ 1 अमेरिकन डॉलर दराने उत्पादित करणे आवश्यक आहे.