

Varsha Gaikwad on Nishikant Dubey in Parliament lobby hindi vs marathi
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील 'हिंदी विरुद्ध मराठी' भाषिक वादाची धग आता राज्याच्या सीमा ओलांडून थेट देशाच्या राजकीय केंद्रस्थानी, म्हणजेच दिल्लीतील संसद भवनापर्यंत पोहोचली आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या लॉबीमध्ये उमटले.
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झालेल्या मराठी खासदारांनी दुबे यांना लॉबीत घेरले आणि जाब विचारला. यानंतर घाबरलेल्या दुबे यांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत तिथून काढता पाय घेतला. या घटनेमुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणात चर्चेत आला आहे.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण घटनाक्रम संसदेच्या कॅन्टीनजवळ घडला. महाराष्ट्रातील मराठी खासदार लॉबीमध्ये निशिकांत दुबे यांना शोधत होते. त्याचवेळी खासदार मनोज तिवारी दिसले. वर्षा गायकवाड यांनी त्यांना दुबे यांच्याबद्दल विचारणा केली.
इतक्यात निशिकांत दुबे स्वतःच मराठी खासदारांच्या दिशेने आले. त्यांना पाहताच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांच्यासह इतर मराठी खासदारांनी त्यांना घेरले.
"तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात असे अपमानजनक विधान का केले? सांगा, कोणाकोणाला पटक पटकून मारणार आहात?" असा थेट आणि आक्रमक सवाल महिला खासदारांनी केला.
महिला खासदारांचा हा आक्रमक पवित्रा पाहून निशिकांत दुबे पूर्णपणे भांबावले. त्यांनी भेदरलेल्या स्वरात "नाही... नाही... तसे काही नाही," असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
अखेर दुबेंनी हात जोडत "जय महाराष्ट्र!" अशी घोषणा दिली आणि गर्दीतून वाट काढत तेथून निघून गेले. त्यांच्या तोंडून 'जय महाराष्ट्र' ऐकून उपस्थित इतर खासदारही अचंबित झाले.
या घटनेमुळे काही काळ संसदेच्या लॉबीमधील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मराठी खासदारांच्या एकजुटीमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे दुबे यांना आपल्या वक्तव्यावरून बॅकफूटवर जावे लागले, असे चित्र निर्माण झाले.
हा संपूर्ण वाद निशिकांत दुबे यांच्या एका विधानामुळे सुरू झाला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मनसे कार्यकर्त्यांकडून हिंदी भाषिकांशी होणारे वाद आणि मारहाणीच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना दुबे यांनी एक प्रक्षोभक विधान केले होते.
ते म्हणाले होते की, "तुम्ही (मराठी लोक) आमच्या पैशांवर जगत आहात. तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत? तुमच्यात एवढी हिंमत असेल आणि तुम्ही हिंदी भाषिकांना मारत असाल, तर मग तुम्ही उर्दू, तमिळ आणि तेलुगू भाषिकांनाही मारून दाखवा.
तुम्ही स्वतःला मोठे 'बॉस' समजत असाल, तर महाराष्ट्राबाहेर पडा. बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडूमध्ये या... 'तुमको पटक पटक के मारेंगे' (तुम्हाला आपटून आपटून मारू)."
दुबे यांच्या याच 'पटक पटक के मारेंगे' वाक्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती आणि त्याचेच पडसाद संसदेत पाहायला मिळाले. त्यांच्या या वक्त्तव्यावर प्रत्युत्तर देताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी- दुबे, तुम मुंबई आ जाओ. मुंबईके समुंदरमे तुम्हे डुबे डुबे के मारेंग, असा पलटवार केला होता.
दरम्यान, आगामी काळात, विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.
तूर्तास, संसदेच्या लॉबीत मराठी खासदारांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे निशिकांत दुबे यांना जाहीरपणे 'जय महाराष्ट्र' म्हणावे लागल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.