

नवी दिल्ली; पीटीआय : वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीचा फायदा मध्यमवर्ग आणि गरिबांना होईल. जवळपास 99 टक्के वस्तूंचा समावेश आता 5 टक्के करश्रेणीत झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
‘पुढील पिढीतील जीएसटी पुनर्रचना’ या विषयावर विशाखापट्टणम येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पूर्वी 12 टक्के करश्रेणीत असणार्या 99 टक्के वस्तू आता पाच टक्के करश्रेणीत आल्या आहेत. त्याचा फायदा देशातील मध्यमवर्ग आणि गरिबांना होईल. नागरिकांच्या हाती खर्च करण्यासाठी दोन लाख कोटी रुपये उपलब्ध असतील. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या हाती अधिक पैसा राहणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या. जीएसटी महसूल 2018 साली 7.19 लाख कोटी रुपये होता. त्यात 2025 मध्ये 22.08 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने वस्तूंच्या जीएसटी दरांची अधिसूचना जारी केली असून, हे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. आता राज्यांनाही याचे अनुकरण करून राज्य जीएसटी दरांची अधिसूचना काढावी लागेल, जेणेकरून सोमवारपासून वस्तू आणि सेवांवर नवे दर आकारले जातील.
सोमवारपासून, जीएसटीची रचना दोनस्तरीय असेल, ज्यामध्ये बहुतेक वस्तू आणि सेवांवर 5 टक्के आणि 18 टक्के कर लागेल. अतिआलिशान वस्तूंवर 40 टक्के कर आकारला जाईल, तर तंबाखू आणि संबंधित उत्पादने 28 टक्के अधिक उपकर या श्रेणीतच राहतील. सध्या, वस्तू आणि सेवा कर 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के अशा 4 टप्प्यांमध्ये आकारला जातो.