
PNB Scam Case : फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याचा धाकटा भाऊ नेहाल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांचे मोठे यश मानले जात आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील त्याच्या सहभागाबद्दल भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी नेहाल मोदीवर अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये हिऱ्यांच्या घोटाळ्याप्रकरणी २.६ दशलक्ष डॉलर्सच्या फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला होता.
ईडी आणि सीबीआय या दोन्ही तपास यंत्रणांनी केलेल्या संयुक्त प्रत्यार्पण विनंतीनंतर नेहाल मोदी याला अटक झाली आहे. दोन्ही यंत्रणांनी नेहाल मोदीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. मोदी कुटुंबीयांना कायद्याच्या चौकटीत आणण्याच्या प्रयत्नांमधील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आता १९ जुलै रोजी प्रत्यार्पणावर सुनावणी हाेणार आहे.
ईडी आणि सीबीआयने दाखल केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारावर नेहाल मोदीला अटक करण्यात आली. दोन्ही यंत्रणा एलएलडी डायमंड्स यूएसए या मोठ्या हिरे कंपनीसोबत झालेल्या २.६ दशलक्ष डॉलर्सच्या फसवणूक प्रकरणी चौकशी करत आहेत. आरोपानुसार, नेहाल मोदीने कॉस्टको या कंपनीसोबत करार करण्याच्या नावाखाली एलएलडी डायमंड्सकडून फसवणूक करून हिरे मिळवले. मात्र हा करार कधीच प्रत्यक्षात आला नाही. त्यानंतर, कंपनीला पैसे देण्याऐवजी नेहालने हे हिरे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गहाण ठेवले तर काहींची विक्री केल्याचा आराेप आहे.
हिऱ्यांच्या फसवणुकीव्यतिरिक्त नेहाल मोदीवर पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळा प्रकरणातही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हा भारतातील सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक मानला जातो. आपला भाऊ नीरव मोदी याच्यासोबत नेहाल मोदीदेखील या अब्जावधी डॉलर्सच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक असल्याचा आरोप आहे.