International Terror Network | दहशतवादी पाक, बांगला देशी हँडलर्सच्या संपर्कात

दिल्ली, मुंबईत रेकी; एका दहशतवाद्याला पुण्यातून उचलले
Terrorists International Connection |
Terrorists International Connection | दहशतवादी पाक, बांगला देशी हँडलर्सच्या संपर्कात
Published on
Updated on

नवी दिल्ली : मुंबई आणि दिल्लीत दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट रचणार्‍या 9 दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. पाकिस्तानी आणि बांगला देशी हँडलर्स देत असलेल्या सूचनानुसार ते कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. अटक केलेले सर्वजण त्यांच्या पाकिस्तान आणि बांगला देशातील हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हे बांगला देशी हँडलर ‘आयएसआय’ आणि दाऊदच्या नेटवर्कचा भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्ली पोलिसांच्या दक्षिण दिल्लीतील मुख्यालयात त्यांची चौकशी सुरू असून, त्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांच्या बँक खात्यांचा तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींना आण्विक केंद्रे, रेल्वे स्थानक आणि दिल्ली, मुंबईतील गजबजलेली बाजारपेठेची ठिकाणे, दिल्लीतील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाची सरकारी प्रतिष्ठाने, सुरक्षा दलांचे जवान आणि प्रसिद्ध धार्मिकस्थळांवर हल्ले करण्याचे आदेश देण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नेपाळी वंशाच्या काही नागरिकांचाही समावेश आहे. या मॉड्यूलला पैशांचा पुरवठा कुठून होत होता, नवीन तरुणांची भरती कशी केली जात होती आणि त्यांना स्थानिक पातळीवर कोणी मदत केली, याचा शोध पोलिस घेत आहेत.

अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांची चौकशी होणार

दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांचा जवळचा साथीदार असलेला मुन्ना झिंग्रा या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा म्हणून समोर आल्यानंतर, तपास यंत्रणा आता आरोपी आणि मुंबईतील अंडरवर्ल्ड यांच्यातील कथित संबंधांचीही चौकशी करत आहेत. झिंग्रा हा पाकिस्तानमधून दहशतवादी कारवायांचे सूत्रसंचालन करत आहे. तपास अधिकार्‍यांच्या मते, ही व्यक्ती सय्यद मुदस्सर हुसेन असल्याचे मानले जाते. तो सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. 2000 मध्ये छोटा राजनवर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news