पुढारी ऑनलाईन डेस्क : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाला (Tahawwur Rana) गुरुवारी अमेरिकेतून विमानाने भारतात आणण्यात आले. राणाचे प्रत्यार्पण "ऑपरेशन राणा" या अत्यंत गुप्त मोहिमेअंतर्गत झाले. न्यायालयाने राणाला 18 दिवसांसाठी एनआयएच्या कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर हुसेन राणा याची चौकशी करणार आहे. दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित कॉल रेकॉर्डची पुष्टी करण्यासाठी राणाचा आवाजाचा नमुना घेण्याच्या तयारीत एनआयए असल्याचे वृत्त आहे.
मुंबईवर २६नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकूण १६६ लोक ठार झाले होते. तर २३८ हून अधिक जखमी झाले होते. एका रिपोर्टनुसार, राणाच्या आवाजाचा नमुना कॉल रेकॉर्डशी जुळवून एनआयए अधिकारी २६ नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यादरम्यान तो फोनवरून सूचना देत होता की नाही हे निश्चित करणार आहेत. त्याच्या आवाजाचा नमुना मिळवण्यासाठी एनआयएला राणाची संमती आवश्यक असेल. जर त्याने नकार दिला तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच राणाने आवाजाचा नमुना घेण्यास नकार दिल्यास याची नोंद आरोपपत्रात केली जाईल, खटल्यादरम्यान त्याच्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सीजीओ कॉम्प्लेक्समधील एनआयए मुख्यालयात राणाची सलग दुसर्या दिवशी चौकशी करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, एनआयए मुंबई हल्ल्यापूर्वी राणा दुबईमध्ये भेटलेल्या एका व्यक्तीबद्दल तपशील उघड करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. २६/११ हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीने मुंबई शहरातील प्रमुख हॉटेल्स आणि सार्वजनिक स्थळांसह संभाव्य लक्ष्यांची तपासणी करण्यासाठी या कार्यालयाचा वापर केल्याचाही संशय आहे. राणाला प्रमुख कट रचणारे झाकीउर रहमान लखवी आणि साजिद मजीद मीर या दोघांच्या भूमिकेबद्दल चौकशी केली जाऊ शकते. तसेच त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या अधिकाऱ्यांशी असलेल्या संबंधांबद्दल आणि हल्ल्यांचा कट रचणाऱ्या दहशतवादी गट लष्कर-ए-तैयबा (एलईटी) शी असलेल्या संबंधांबद्दल देखील चौकशी केली जाईल.
'एनआयए'च्या सूत्रांनुसार, राणाने चौकशीच्या पहिल्या दिवशी सहकार्य केले नाही. घटनांचा क्रम आठवण्यात तो अडचणीत असल्याचा दावा करत असला तरी, त्याने हल्ल्यांपूर्वी किमान एक आठवडा मुंबईत उपस्थित असल्याचे पुष्टी केली आहे. राणाने पाकिस्तानमधील त्याच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्याचे कुटुंब, शिक्षण, पत्नीसोबत कॅनडाला स्थलांतर आणि शिकागोमध्ये ट्रॅव्हल एजन्सी सुरु करणे आदी माहितीचा समावेश आहे.