पुढारी ऑनलाईन डेस्क : दहशतवादी घुसखोरी प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) आज (दि.२१) सकाळी जम्मू-काश्मीरमध्ये धडक कारवाई केली. रियासी, डोडा, उधमपूर, रामबन आणि किश्तवाड येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवाद्यांचे लांगेबांधे असणार्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएच्या पथकाने आज पोलिस आणि निमलष्करी दल सीआरपीएफच्या मदतीने रियासी, डोडा, उधमपूर, रामबन आणि किश्तवाड जिल्ह्यांमध्ये परिसर छापे टाकले. एकाचवेळी आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यात घुसखोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रीय तपास संस्थेने ही कारवाई केली आहे.
सुमारे आठवडाभरापूर्वी 'एनआयए'ने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी जम्मूच्या बजलहटा येथे साहिल अहमद याच्या घरावर छापा टाकला होता. तपासादरम्यान एनआयएला साहिल अहमदच्या खात्यात १५ लाख रुपये संशयास्पदरित्या जमा झाल्याचे आढळले होते. अहमदाबादच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेल्या हुमायून खान नावाच्या फरारी गुन्हेगाराने १५ लाख रुपयांची ही रक्कम जमा केल्याचेही स्पष्ट झाले होते. साहिल अहमद याचा काका गुलजार अहमद मलिक १९९२ मध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बनला होता, असे एनआयएच्या तपासात समोर आले होते.. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तानातील सियालकोट येथे राहत होता. एनआयआयएच्या टीमने साहिल आणि त्याच्या काही नातेवाईकांचीही चौकशी केली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. नॅशनल कॉन्फरन्सचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून राज्यात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. १८ ऑक्टोबर रोजी शोपियानमध्ये एका मजुराची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. यानंतर 20 ऑक्टोबर रोजी गांदरबलमधील बांधकाम कंपनीच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात डॉक्टरांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. तर पाच जण जखमी झाले. २४ ऑक्टोबर गुलमर्गजवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते, तर दोन घुसखोरांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते. 28 ऑक्टोबरला जम्मूच्या अखनूरमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. 1 नोव्हेंबर रोजी बडगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात उत्तर प्रदेशातील दोन कामगार जखमी झाले होते. त्याचवेळी बांदीपोरा येथील लष्करी छावणीवर हल्ला करण्यात आला.