

मुंबई : जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये आता मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी गुरुवारी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण, हवामान बदल आणि शिक्षण या क्षेत्रांत एकमेकांना सहकार्य करण्याबरोबरच दोन्ही देशांतील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्याची निर्मिती करण्याचा निर्धार केला. या निर्णयामुळे भारत आणि ब्रिटनमध्ये परस्परांत सहकार्याची भावना आणि व्यापार वाढून दोन्ही देशांमध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, युक्रेनचा संघर्ष आणि गाझाच्या मुद्द्यावर भारत चर्चा आणि मुत्सद्देगिरीद्वारे शांतता पुनर्स्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नांचे समर्थन करीत असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुंबईत मुक्कामी असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांची गुरुवारी मुंबईतील राजभवन येथे उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील सहकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर दोन्ही देशाच्या पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत संयुक्तपणे निवेदन केले.
स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि यूके या दोन्ही देशांच्या संबंधामध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असल्याचे कौतुकोद्गार काढत पंतप्रधान मोदी म्हणाले, जुलै महिन्यातील माझ्या यूके देशाच्या भेटीदरम्यान आपण ऐतिहासिक व्यापक आर्थिक आणि व्यापार करारावर सहमती दर्शवली होती. या करारामुळे दोन्ही देशांचा आयात खर्च कमी होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, व्यापार वाढेल आणि त्याचा दोन्ही देशांच्या उद्योग व ग्राहकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती मैत्री जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वाचा आधार ठरली असून दोन्ही देश जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, असेही मोदी म्हणाले.
इंडो पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे सांगत पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही ब्रिटनचे औद्योगिक कौशल्य, संशोधन आणि विकास याला भारताची प्रतिभा आणि व्याप्तीशी जोडण्यावर काम करत आहोत. आम्ही हवामानविषयक तंत्रज्ञान स्टार्टअप निधीची स्थापना केली आहे. यातून दोन्ही देशांतील हवामान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम तंत्रज्ञान या संदर्भात काम करणारे दोन्ही देशांचे नवोन्मेषक आणि उद्योजक अधिक सक्षम होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पंतप्रधान कार्यालयातील उच्च अधिकार्यांसह ब्रिटनमधील नऊ विद्यापीठांचे कुलगुरू, विविध कंपन्यांचे उच्च अधिकारी, व्यावसायिक, उद्योजक आदी यावेळी उपस्थित होते.
संरक्षण आणि सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बाबतीत भारत आणि यूके यांच्या संबंधांमध्ये नवे पैलू जोडले जात असून दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना एकमेकांशी जोडत आहोत, असे मोदी म्हणाले. दोन्ही देशांच्या लष्करी प्रशिक्षणाच्या सह्योगाबाबत सामंजस्य करार केला असून त्या अंतर्गत भारतीय वायुसेनेचे प्रशिक्षक यूकेच्या रॉयल एअर फोर्सला ट्रेनिंग देतील, असे मोदी यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची बैठक मुंबईत होत असताना दुसरीकडे देशांच्या नौदलांची जहाजे कोकण 2025 अंतर्गत संयुक्तपणे सराव करीत असल्याचे मोदी यांनी सांगितले.
तीन विद्यापीठांचे मुंबईत कॅम्पस : दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी सीईओंच्या शिष्टमंडळाला संबोधित करताना नऊ ब्रिटिश विद्यापीठे भारतात कॅम्पस उभारतील, असे घोषित केले. यातील साऊथॅम्प्टन विद्यापीठाने गुरुग्राम येथे शैक्षणिक संकुल उभारले आहे .
या शहरातील विद्यापीठ संकुल उभारले जाईल ती अशी : * युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल (बंगळूर) * युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क (मुंबई) * युनिव्हर्सिटी ऑफ अबरदीन (मुंबई) * युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉल (मुंबई)
युनिव्हर्सिटी ऑफ सरे (गिफ्ट सिटी, गुजरात)