नवी दिल्ली चेंगराचेंगरी : प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद, ६० रेल्वे स्थानकांवर होल्डिंग एरिया

Delhi Railway Station Stampede | प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर विशेष देखरेख
Delhi Railway Station Stampede
नवी दिल्‍ली रेल्‍वे स्‍थानकावर शनिवारी रात्री महाकुंभला जाणार्‍या भाविकांची गर्दी उसळली होती.
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पादचारी पुलावर अनावश्यक थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच स्थानकावर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले असून गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी काही दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी सुरक्षा उपाय करण्यात आले आहेत. प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांवर विशेष देखरेख ठेवली जाईल, अशाच प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सुरक्षा पथके प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे निरीक्षण करणार आहेत, अशी माहिती आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सदर घटनेनंतर गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने २६ फेब्रुवारीपर्यंत दुपारी ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत काउंटरवरून प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली आहे. भविष्यात गर्दीच्या काळात चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी रेल्वेने देशातील ६० प्रमुख स्थानकांवर होल्डिंग एरिया तयार करण्याची योजना आखली आहे.

आम्ही अनेक लोकांना विनाकारण पादचारी पुलावर वाट पाहताना किंवा उभे असल्याचे पाहिले आहे, ज्यामुळे इतर प्रवाशांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यास विलंब होत आहे. आता, वैध कारणाशिवाय कोणालाही पादचारी पुलावर उभे राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Delhi Railway Station Stampede | बॅरिकेड्स उभारले

प्लॅटफॉर्म क्रमांक १६ ते प्लॅटफॉर्म क्रमांक १३ पर्यंत, आम्ही प्रत्येक ट्रेनच्या डब्याचे निरीक्षण करण्यासाठी आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. याशिवाय, गरजेनुसार आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज असतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. रविवारी असंख्य प्रवाशांनी रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने स्टेशनवर गर्दी झाली होती, त्यामुळे गर्दी हाताळण्यासाठी दिल्ली पोलिस, आरपीएफ आणि सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) मधील अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुढील कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही बॅरिकेड्स उभारले आहेत, गस्त वाढवली आहे आणि जलद प्रतिक्रिया पथके तैनात केली आहेत, असे आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना

गर्दी नियंत्रणासाठी नियंत्रण कक्ष रिअल टाइम फुटेजवर लक्ष ठेवून सीसीटीव्ही देखरेखदेखील वाढविण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशांना सूचना देण्यासाठी आणि गर्दीची परिस्थिती टाळण्यासाठी नियमित घोषणा केल्या जात आहेत. दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेच्या दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास रेल्वेच्या सूचनांनी गोंधळलेले प्रवासी, अरुंद जिन्यावरून प्लॅटफॉर्म १६ कडे धावत असताना ही प्राणघातक घटना झाली. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकांनी अडथळा निर्माण केल्याने परिस्थिती गंभीर बनली. वेगाने घबराट पसरली आणि गर्दी निर्माण झाली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजीच्या या चेंगराचेंगरीत ११ महिला आणि ५ मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला. २५ जण जखमी झाले आहेत. याशिवाय, २८ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी महाकुंभात रात्री उशिरा झालेल्या चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू झाला होता.

१ तासात २६०० जनरल तिकिटे विकली गेली

चेंगराचेंगरीच्या चौकशीत असे दिसून आले की रेल्वेने नवी दिल्ली स्थानकावर दर तासाला १,५०० जनरल तिकिटे विकली आहेत. अहवालात असेही म्हटले आहे की, रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) कर्मचाऱ्यांची तैनाती पुरेशी नव्हती, ज्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यात अडचणी निर्माण झाल्या आणि परिस्थिती आणखी बिकट झाली. घटनेच्या दोन तास आधी (१५ फेब्रुवारी रोजी) रेल्वेने एका तासात २६०० जनरल तिकिटे विकली होती. साधारणपणे एका दिवसात ७ हजार तिकिटे विकली जात असत, परंतु या दिवशी ९६०० तिकिटे विकली गेली असल्याचे समजते.

Delhi Railway Station Stampede
नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी कशी झाली ? खरे कारण आले समोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news