

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम गुरुवारी म्हणजेच २० फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असल्याचे समजते. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याचे समजते. (Delhi CM Oath)
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित करण्यासाठी सोमवारी बोलावण्यात आलेली विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता विधिमंडळ पक्षाची बैठक १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि २० फेब्रुवारी रोजी नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ होणार आहे, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. शपथविधीच्या तयारीसाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुघ यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. शपथविधी कार्यक्रमाला राजकीय मंडळींसह उद्योगपती, चित्रपट आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम भव्य होणार असल्याचे समजते. ज्यामध्ये दिल्लीतील १२,००० ते १६,००० रहिवासी, विविध देशांचे राजदूत आणि विविध धर्मगुरु देखील उपस्थित राहतील अशी शक्यता आहे. (Delhi CM Oath)
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री हा निवडून आलेल्या आमदारांमधूनच असेल. तर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांची नावेही जाहीर केली जाऊ शकतात. सध्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, शिखा राय, जितेंद्र महाजन, रवींद्र सिंह, राजकुमार भाटिया यांची नावे आहेत. मात्र, भाजपची पद्धती पाहता, चर्चेत असणाऱ्या चेहऱ्याला सोडून देखील मुख्यमंत्री केले जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने १५ आमदारांची नावे विचारात घेण्यात आली. त्यापैकी ९ नावांची निवड करण्यात आली आहे. या ९ नावांमधून मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित केली जाईल. दिल्ली मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त ७ मंत्री असू शकतात. अशा परिस्थितीत, दिल्लीतील ७ लोकसभा जागांमधून प्रत्येकी एक भाजप आमदार मंत्री होऊ शकतो अशी चर्चा आहे. बिहार आणि पंजाबच्या निवडणुकांव्यतिरिक्त, जातीय समीकरणे लक्षात घेऊन या सर्व निवडी केल्या जाण्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शपथविधी सोहळ्यासाठीच्या रामलीला मैदानावरील तयारीची पाहणी केली. तसेच या कार्यक्रमाच्या तयारीसाठी तावडे यांनी भाजप मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीमध्ये दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा आणि इतर नेते उपस्थित होते.