ब्रेकिंग न्‍यूज : NEET ची पुनर्परीक्षा घेता येणार नाही : सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्वाळा

परीक्षेत गैरप्रकार झाल्‍याचे पुरेसे पुरावे नाहीत
NEET-UG 24
पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्‍या जाणार्‍या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.23) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्‍या जाणार्‍या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.23) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. NEET-UG चे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेत पद्धतशीरपणे गैरप्रकार झाला आहे, हे दर्शविणारी पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे NEET ची पुनर्परीक्षा घेता येणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

काय म्‍हणाले सर्वोच्‍च न्‍यायालय ?

याचिकाकर्त्यांचे वकील आणि सॉलिसिटर जनरल यांचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निकालाचे वाचन केले. ते म्‍हणाले, सर्वोच्‍च न्‍यायालयाने नीट परीक्षेमध्‍ये झालेल्‍या अनियमिततेप्रकरणी ८ जुलै २०२४ रोजीच्‍या अंतरिम आदेशात एनटीए, केंद्र सरकार आणि CBI द्वारे खुलासा मागवला होता. या प्रकरणी सीबीआयचेअतिरिक्त संचालक श्री कृष्णा तपासाच्या स्थिती सांगण्‍यासाठी न्यायालयात हजर झाले होते. NEET-UG चे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेच्‍या पावित्र्यामध्ये पद्धतशीरपणे उल्लंघन झाले आहे, हे दर्शविणारी पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे NEET ची पुनर्परीक्षा घेता येणार नाही.

नीट पेपरफुटी पाटणा आणि हजारीबाग येथे झाली होती. सीबीआय पेपरफुटीचा तपास सुरू ठेवणार आहे. वैद्‍यकीय प्रवेशासाठीचे समुपदेशन आणि इतर प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी तसेच SC भविष्यातील परीक्षा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देईल, असेही सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

प्रश्न क्रमांक १९ च्या उत्तरावर चर्चा

NEET-UG 2024 परीक्षेतील दोन्‍ही पर्यायांना गुण दिलेल्‍या प्रश्‍न क्रमांक १९ च्‍या उत्तरावर आपलं मत देण्‍यासाठी आयआयटी दिल्‍लीने तज्ज्ञांची समिती तयार करावी, या समितीने मंगळवार[ (२३ जुलै) दुपारपर्यंत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्‍च न्‍यायालयाने सोमवारी झालेल्‍या सुनावणीवेळी दिले होते. आज झालेल्‍या सुनावणीत मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड म्हणाले, आम्हाला आयटीआय दिल्लीने स्थापन केलेल्‍या तीन सदस्‍यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्यानुसार या प्रश्नासाठी पर्याय 4 बरोबर आहे, असे स्‍पष्‍ट केले.

उमेदवार वैयक्तिक तक्रारी प्रकरणांबाबत उच्च न्यायालयात जाऊ शकतात : सरन्‍यायाधीश

सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज स्‍पष्‍ट केले की, ज्या उमेदवारांना वैयक्तिक तक्रारी आहेत ते त्यांच्या प्रकरणांबाबत उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

संपूर्ण परीक्षेचे पावित्र्य नष्‍ट करणारा प्रकार : ॲड. हुडा

आज सुनावणीच्‍या प्रारंभी नीट परीक्षेमध्‍ये झालेल्‍या गैरप्रकारांमुळे प्रामाणिक परीक्षार्थींचे रँकिंग घसरले आहे, अशी तक्रार याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा यांनी केली. ते म्‍हणाले, काही परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका २० मिनिटे उशिरा मिळाली. ती प्रश्नपत्रिका त्याने पहिले 3 तास आणि नंतर पुढचे 3 तास सोबत ठेवली त्यामुळे ही प्रश्नपत्रिका ६ तास त्याच्याकडे होती. एका परीक्षार्थीला पेपर सोडविण्‍यासाठी ३ तास २० मिनिटे मिळतात, तर काही परीक्षार्थींना या लोकांना एकाच दिवसात 3 तास 20 मिनिटे दोनदा मिळत आहेत, तरीही प्रश्न बदलले नाहीत, हा संपूर्ण प्रकारच परीक्षेचे पावित्र्य नष्‍ट करणारा आहे.

पेपरफुटीचा फायदा केवळ १५५ उमेदवारांना : सॉलिसिटर जनरल

यावेळी सॉलिसिटर जनरल म्‍हणाले की, आम्‍ही केवळ दोन ते पाच परीक्षा केंद्रावरच गैरप्रकार झाल्‍याची भीती व्‍यक्‍त केली आहे. शंका खरी असली तरी ती त्या केंद्राचीच असेल. आम्ही तुमच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आकडेवारीने समाधानी असले पाहिजे, कोणत्याही सोशल मीडिया किंवा टेलीग्राम व्हिडिओद्वारे नाही. टॉप १०० विद्यार्थी 95 केंद्रे, 56 शहरे आणि 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहेत.नीट परीक्षेतील पेपरफुटीचा फायदा फक्त 155 लोकांना झाला आहे. या 155 लोकांपैकी फक्त दोघांना जणांना ५७३ आणि ५८१ गुण मिळाले आहेत. बाकींना फक्‍त १११ गुण मिळाले आहे, असा दावा सॉलिसिटर जनरल यांनी केला. यावर टेलिग्रामवर आलेल्या व्हिडिओचे काय?, असा सवाल सरन्‍यायाधीशांनी केला.टेलिग्रामवर आलेला पेपर तोच आहे जो परीक्षेत सोडवण्यासाठी दिला होता. याची पुष्टी करणारा कोणताही फॉरेन्सिक अहवाल आहे का?, असा सवाल सरन्‍यायाधीशांनी केला असता सध्‍या तरी असा कोणताही अहवाल नसल्‍याचे सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले.

मी न्यायालयापासून काहीही लपवणार नाही : सॉलिसिटर जनरल

यावेळी सरन्‍यायाधीश चंद्रचूड यांनी या परीक्षेत ग्रेस गुण देण्‍यात आलेल्‍या १५६३ उमेदवारांचा फेरपरीक्षेचा निकाल पाहण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली. फेरपरीक्षेला 1563 पैकी 816 फेरपरीक्षेला बसले. या उमेदवारांनी त्यांचे ग्रेस मार्क्स उणे असतानाही चांगले गुण मिळवले आहेत. आम्ही कोणत्याही उमेदवाराला फेरपरीक्षा देण्यास भाग पाडू शकत नाही. कॅनरा बँकेच्या प्रश्नपत्रिका वाटण्यासाठी शहर समन्वयकाला परवानगी कोणी दिली?, असा सवाल सरन्‍यायाधीशांनी केला असता. ही मानवी चूक होती. आम्ही 24 लाख उमेदवारांसाठी एकाच वेळी परीक्षा घेत आहोत. अधिकार देण्यासाठी, परवानगी पत्र डिजिटल स्वरूपात येते, ते छापल्यानंतर ते परत बँकेकडे पाठवावे लागते. ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रक्रियेत बँक आणि केंद्र दोन्हीकडून काही चुका झाल्या. पेपर कोणाला द्‍यावा आणि कोणाला नाही याची माहिती दोन्ही बँकांनी द्यायला हवी होती. मी न्यायालयापासून काहीही लपवणार नाही, आमच्याकडून इथे चूक झाली, अशी कबुली सॉलीसिटलर जनरल यांनी दिली.

नीट परीक्षेचा पर्सेंटाईल दरवर्षीच ५० टक्‍के असतो का? : सरन्‍यायाधीश

नीट परीक्षेतील पर्सेंटाइल हा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळणारा आकडा आहे. निकाल संगणक प्रणालीमध्ये फेड केला जातो. यानंतर 50% पर्सेंटाइल हे १६४ निघाले. 24 लाख विद्यार्थ्यांपैकी 12.5 लाख 164 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. तर 12.5 लाखांनी 164 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ते समुपदेशन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात, असे सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले. यावेळी सरन्‍यायाधीशांनी विचारणा केली की, नीट परीक्षेचा पर्सेंटाईल ५० टक्‍के असतो का? यावर सॉलिसिटर जनरल म्‍हणाले की, गेल्या वर्षी १३७ होते. यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी अधिक मेहनती होते. त्‍यामुळे गुण अधिक मिळाले.

न्यायालयाने फेरपरीक्षेचा निर्णय न दिल्यास मुलांवर अन्याय होईल : ॲड. हुडा

गँगस्टर संजीव मुखिया हा नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटला. तो व्हॉट्स ॲपवरूनही व्‍हायरल झाला आहे. याचा फायदा फक्त बिहारमधील हजारीबाग आणि पाटणा येथील उमेदवारांना झाला आरोपींनी तपास संस्‍थांसमोर असा जबाब दिला आहे. सीबीआयने हा अहवाल न्यायालयात सादर केला असता, पेपरफुटीनंतर एकही मोबाइल फोन जप्त करण्यात आलेला नाही, असे म्हटले आहे. हजारीबाग आणि पाटणा येथेच गैरप्रकार झाला असे कसे म्‍हणता येईल?मर्यादित ठिकाणी पेपर फुटला, असा दावा सॉलिसिटर जनरल करत आहेत. त्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. समजा अटक झाल्यानंतर या प्रकरणातील सूत्रधार संजीव मुखियाने २०० ठिकाणी पेपर पाठवले आहेत असे म्हटले तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. न्यायालयाने फेरपरीक्षेचा निर्णय न दिल्यास मुलांवर अन्याय होईल, असे यावेळी ॲड. हुडा यांनी सांगितले.

"हे निंदनीय आहे..." : सरन्‍यायाधीशांनी ॲड. नेदुमपारा यांना फटकारले

आज याचिकाकर्त्यांचे वकील नरेंद्र हुडा युक्‍तीवाद करत होते. यावेळी अचानक ॲड मॅथ्यूज नेदुमपारा यांनी हस्तक्षेप केला. मला काही सांगायचे आहे, असे ते म्‍हणाले. यावेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगतले की, नरेंद्र हुडा यांचा युक्‍तीवाद झाल्‍यानंतर तुम्‍हाला बोलण्‍याची संधी दिली जाईल. मी येथे सर्वात ज्येष्ठ आहे, असे नेदुमपारा यांनी सांगितले. यावर सरन्‍यायाधीश चंद्रचूड म्‍हणाले की, श्रीमान नेदुमपारा, मी तुम्हाला चेतावणी देत ​​आहे. तुम्‍हाला गॅलरीतून बोलता येणार नाही. मी न्यायालयाचा प्रभारी आहे. असे सांगत त्‍यांनी सुरक्षा रक्षकांना बोलवा त्‍यांना येथून चालते करा, असेही त्‍यलांनी सुनावले. यावर ॲड. नेदुमपारा यांनी मी निघत आहे. मी जातोय, असे सांगितले. तुम्हाला असे सांगायची गरज नाही. तुम्‍ही न्‍यायालय सोडू शकता, मी गेल्या २४ वर्षांपासून न्यायव्यवस्था पाहिली आहे. मी वकिलांना या कोर्टात प्रक्रिया ठरवू देऊ शकत नाही, असेही सरन्‍यायाधीशांनी ॲड. नेदुमपारा यांना सुनावले. यावर मी नेदुमपार यांनीही प्रत्‍युत्तर दिले. मी १९७९ पासून न्‍यायालयीन कामकाज पाहत असल्‍याचे म्‍हटले. यानंतर मात्र सरन्‍यायाधीशांचा संताप अनावर झाला. मला आदेश जारी करावे लागतील ते योग्‍य हेणार नाही, हे निंदनीय आहे, अशा शब्‍दांत त्‍यांनी आपला संताप व्‍यक्‍त केला.

ॲड. नेदुमपारा न्‍यायालयात परतले, सरन्‍यायाधीशांची मागितली माफी

सुनावणी सुरु असताना स्‍वत:हून न्‍यायालयाबाहेर गेलेले ॲड मॅथ्यूज नेदुमपारा पुन्‍हा न्‍यायालयात परतेले. त्‍यांनी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची माफी मागितली. ते म्‍हणाले की, मला क्षमा करा. मात्र, ही येथील चर्चा ऐकून मला धक्काच बसला आहे. आम्ही येथे फौजदारी खटला चालवत आहोत आणि सीबीआयशी चर्चा करत आहोत. नीट परीक्षेचे पेपर फुटला आहे की नाही, नाही हे कोणत्याही सामान्य माणसाला विचारा. पुनर्परीक्षेशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे अस्वस्थता निर्माण होऊ शकते, परंतु समस्या कमी करण्याचा हा एकमेव मार्ग आहे, अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली.

परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नाही : ॲड. नेदुमपारा

नीट परीक्षा वादाचा मुद्दा २० मिनिटांत संपायला हवा होता. संसदेतही हा मुद्दा आहे हा प्रशासकीय प्रश्न असून, आतापर्यंत सरकारने यावर ठोस पावले उचलायला हवी होती. परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नाही. ही समस्या 20 मिनिटांत संपली पाहिजे. संसदेतही NEET चा मुद्दा आहे. न्यायमूर्ती पार्डीवाला, मी तुमचा खूप आदर करतो. माझा अपमान झाला हे मला मान्य आहे पण माझ्या मनात काेणा विषयी काहीच नाही, असे सांगत NEET रद्द करावी, अशी मागणी ॲड. नेदुमपारा यांनी केली. मी भाजपविरोधी नाही. मी भाजपला मतदान करण्याचा वकिली करतो; पण आज काय झाले? हे अस्वीकार्य आहे, आजचे सरकार जनतेला जबाबदार आहे, असेही ते यावेळी म्‍हणाले.

'नीट'परीक्षा वाद, आतापर्यंत काय घडलं?

  • ५ मे २०२४ रोजी नीट परीक्षा झाली. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाला.

  • तब्‍बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्‍या पैकी गुण. तर काहींना ७२० पैकी ७१८, ७१९ गुण मिळाले. हरियाणाच्या एकाच केंद्रातील ६ विद्यार्थ्यांना पैकीच्‍या पैकी गुण मिळाले. यामुळे परीक्षेतील अनियमिततेबद्दल शंका निर्माण झाली.६७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्‍यात आल्‍यानेच पैकीच्‍या पैकी गुण मिळाल्‍याचा आरोप करण्‍यात आला.

  • NTA ने 8 जून रोजी वाढीव गुणांच्‍या चौकशी करण्यासाठी समिती स्थापन.

  • परीक्षेनंतर आठ दिवसांनी पेपरफुटीच्या चौकशीसाठी पहिली याचिका दाखल.

  • बिहार पोलिसांनी ५ मे रोजी पेपरफुटीच्या संशयावरून १३ जणांना अटक केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी पेपर फुटल्याचा आरोप फेटाळला.

  • NEET उमेदवार शिवांगी मिश्रा यांनी 13 मे रोजी पेपर फुटीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल.

  • १३ जून रोजी १,५६३ उमेदवारांना देण्‍यात आलेले ग्रेस गुण रद्द.

  • 13 जून रोजी, NTA ने 1563 अतिरिक्त गुणांसह उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्याची घोषणा केली. त्यापैकी 813 उमेदवार परीक्षेला बसले तर 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत.

  • NTA ने 23 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल जारी केल्यानंतर 1 जुलै रोजी सुधारित गुणवत्ता यादीही जाहीर केली होती.या परीक्षेनंतर पैकीच्‍या पैकी गुण मिळवणार्‍या ६७ उमेदवारांची संख्‍या ६१ वर आली आहे.

  • ८ जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्‍पष्‍ट केले होते की, "परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता, सुमारे 24 लाख, पुन्हा चाचणीचे आदेश देणे योग्य होणार नाही. तसेच अशा अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून न्यायालय NEET परीक्षेच्या 'पावित्र्या'बद्दल काळजीत आहे. याची चौकशी करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केली असेल, तर त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा."

  • केंद्र सरकारने आयआयटी मद्रासने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला होता. पेपरफुटी मोठ्या प्रमाणावर झाली नाही किंवा एकाच केंद्रातील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला नाही, असे या अहवालात म्‍हटलं होतं.

  • ११ जुलै : सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्‍या अध्‍यक्षतेखालील न्‍यायमूर्ती जेबी परडीवाला, न्‍यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्‍या खंडपीठाने NEET-UG 2024 प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १८ जुलै रोजी होणार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

  • १८ जुलै : NEET-UG 2024 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवून राज्‍य आणि केंद्रानुसार जाहीर करावा. बिहार पोलिसांनी आपल्‍या तपास अहवालाची प्रत सादर करावी, असे निर्देश18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने दिले होते.

  • २० जुलै : सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार NEET UG 2024 परीक्षेचा राज्‍य आणि केंद्रनिहाय निकाल २० जुलै रोजी घोषित करण्‍यात आला.

  • २२ जुलै : NEET-UG 2024 परीक्षेतील दाेन्‍ही पर्यायांना गुण दिलेल्‍या प्रश्‍न क्रमांक १९ च्‍या उत्तरावर आपलं मत देण्‍यासाठी आयआयटी दिल्‍लीने तज्ज्ञांची समिती तयार करावी, या समितीने मंगळवार[ (२३ जुलै) दुपारपर्यंत आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सोमवारी झालेल्‍या सुनावणीवेळी दिले होते.

  • २३ जुलै : NEET-UG चे निकाल पूर्णपणे चुकीचे आहेत आणि परीक्षेत पद्धतशीरपणे गैरप्रकार झाला आहे, हे दर्शविणारी पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे NEET ची पुनर्परीक्षा घेता येणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news