

नवी दिल्ली, : नीट यूजीची फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार आहे. या परीक्षेच्या आयोजनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट लक्ष असल्याचे समजते. तसेच नीट फेरपरीक्षेच्या सुरक्षित आयोजनासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देखील जबाबदारी देण्यात आल्याचे समजते. फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि एनटीएचे प्रमुख अभिषेक सिंह उपस्थित होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत नीट परीक्षेसंबंधित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या तक्रारी, संभाव्य अनियमितता आणि त्यावरचे संभाव्य उपाय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच फेरपरीक्षेची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष राहील याची खात्री करणे आणि विद्यार्थ्यांची चिंता दूर करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी हवाई दलाची मदत घेण्याचा विचार सुरु
नीट फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षेत वाढ करण्याच्या उद्देशाने, प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. मात्र, याबाबतीत अंतिम निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीट फेरपरीक्षेसाठी मंत्रालयांमध्ये समन्वय
सूत्रांनुसार, नीट फेरपरीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक मदतीची गरज लक्षात घेता, विविध मंत्रालयांमध्ये समन्वय देखील साधला जात आहे. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत परीक्षा केंद्रांवरील सुरक्षा, पाळत आणि प्रशासकीय व्यवस्था बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला. या बैठकीदरम्यान एनटीएप्रमुखांकडून परीक्षेच्या तयारीबाबतचा अभिप्रायही मागवण्यात आला. विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आणि कोणतीही वादाची छटा न लागता परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
दरम्यान, नीट पेपरफुटीनंतर सीबीएसई गोंधळामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. राहुल गांधींसह विरोधी पक्ष धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहे. यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळाच्या फेरबदलामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्याकडील शिक्षण मंत्रालय काढून घेतले जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.