

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणात सोमवारी (दि. २५) सीबीआयने आरोपी मनीषा हवालदार, प्रल्हाद कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला सीबीआय न्यायालयात हजर केले. तिघांपैकी मनीषा हवालदारला ६ दिवसांची सीबीआय कोठडी तर प्रल्हाद कुलकर्णीला ४८ तासांची सीबीआय कोठडी सुनावली आणि मनिषा वाघमारेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सकाळी सर्वप्रथम मनीषा हवालदारला तर दुपारून प्रल्हाद कुलकर्णी आणि मनिषा वाघमारेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन सुनावण्या स्वतंत्र पार पडल्या.
भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेच्या भाषांतराशी संबंधित प्राध्यापक मनिषा हवालदारला न्यायालयासमोर सकाळी सादर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, भौतिकशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका मनिषा हवालदार हिच्याकडे आली होती आणि तिच्याकडूनच प्रश्नपत्रिकेचे सर्क्युलेशन झाल्याचे समोर आले आहे. तसेच आर्थिक फायद्यासाठी काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा संशय असल्याचेही सांगण्यात आले. या संपूर्ण गोष्टींचा तपास करण्यासाठी ६ दिवसांची सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली.
दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी या आरोपांना विरोध करताना मनिषा हवालदार केवळ भौतिकशास्त्र विषयाची भाषांतराचे काम करत होती. आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत. आतापर्यंत तिच्याविरोधात ठोस काहीही समोर आलेले नाही,” असाही दावा त्यांनी केला. तसेच आपल्या अशिलाशी चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंतीही बचाव पक्षाने न्यायालयाकडे केली, न्यायालयाने ही विनंती मान्य केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने मनिषा हवालदारला ६ दिवसांची सीबीआय कोठडी दिली. दरम्यान, मनिषा हवालदारच्या पतीला भेटीची परवानगी देण्याची विनंती बचाव पक्षाने केली होती मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.
सोमवारी (दि. २५) दुपारी नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्रल्हाद कुलकर्णी आणि मनिषा वाघमारेला सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. दोघांचीही सीबीआय कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते. सीबीआयने आरोपी प्रल्हाद कुलकर्णीच्या चौकशीसाठी आणखी दोन दिवसांची कोठडी मागितली. तपासाच्या दृष्टीने काही बाबींची पडताळणी बाकी असल्याचे सीबीआयकडून न्यायालयात सांगण्यात आले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयाने प्रल्हाद कुलकर्णीला ४८ तासांची सीबीआय कोठडी मंजूर केली. तर या प्रकरणातील दुसरी आरोपी मनिषा वाघमारे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सुनावणीदरम्यान, प्रल्हाद कुलकर्णीच्या वकिलांनी सीबीआय कोठडीच्या मागणीला विरोध केला. आरोपीला यापूर्वीच दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली होती. तपासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे गोळा करण्यात आले आहेत. १४ मे रोजी अटक झाल्यानंतर तपास पूर्ण झाला असून, आता केवळ कोठडी वाढवून घेण्यासाठी ही मागणी केली जात आहे,” असा दावा बचाव पक्षाने केला.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना आरोपी मनीषा वाघमारेचे वकील ॲड. श्रेयस गच्चे म्हणाले की, सुनावणी दरम्यान मी मनिषा वाघमारेची बाजू मांडली. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांच्यावर नीट परीक्षेच्या पेपरचा काही भाग फॉरवर्ड केल्याचा आरोप आहे. आम्ही जामिनासाठी अर्ज करणार आहोत. सीबीआय जो पर्यंत आरोपपत्र दाखल करत नाही तोपर्यंत आरोप हे केवळ आरोप आहेत.