नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या २६ जागांपैकी १६ जागी अजित पवार गटाने उमेदवार दिले आहेत. २५ सप्टेंबर दिवशी या जागांसाठी मतदान होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संसदीय पक्षाच्या संमतीनंतर ही यादी जाहीर करण्यात आली. यापूर्वीच अजित पवार गटांनी जम्मू-काश्मीरसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक लढवत आहे.
अजित पवार गटाने दिलेले प्रमुख उमेदवार
मोहम्मद अल्ताफ- गंडेर्वाल
शदीब हनीफ खान- हजरतबाल
निसार अहमद- खन्यार
जाहिद बशेर काशु- हबाकंदल
समीर अहमद भट- लाल चौक
अशोक कुमार- माता वैष्णोदेवी
जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आघाडीमध्ये एकत्र निवडणूक लढणार आहे. तर भाजप, पीडीपी, गुलाम नबी आझाद यांच्या पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे.