

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचे समजते. काँग्रेसच्या दिल्ली वर्तुळातील एका ज्येष्ठ नेत्याने या संदर्भात भाष्य केले. विशेष म्हणजे गुरुवारी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्याने या गोष्टीची सुरुवात झाली. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे या नेत्यांची वक्तव्ये देखील महत्वाची आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती १९९९ साली काँग्रेस पक्षातूनच झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यापासून पक्ष म्हणून ते वेगळे असले तरी काँग्रेस बरोबर वैचारिक मार्ग एकच आहे म्हणत काँग्रेसबरोबर राहिले. १९९९ पासून २०१४ चा अपवाद वगळता दोन्ही पक्षांनी निवडणुका सोबत लढवल्या, सरकारमध्येही ते सोबत होते. ३ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. यापैकी शरद पवार गट काँग्रेस सोबत थांबला तर अजित पवार गटाने सत्तेत जाणे पसंत केले. मात्र अलीकडच्या काळात जी परिस्थिती उद्भवली त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने स्वतःहून प्रस्ताव काँग्रेस पक्षाला प्रस्ताव दिला आहे. यावर काँग्रेस पक्ष नेतृत्व विचार करणार असल्याचे समजते.
गुरुवारी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सरचिटणीस, सर्व राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते. आणि बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दीन झाला. या दोन्ही कार्यक्रमाच्या दरम्यान ही माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस पक्ष पश्चिम बंगालमध्ये सलग तीन टर्म सत्तेत होता. मात्र २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने बंगालची निवडणूक जिंकली. निकाल लागल्यानंतर ताबडतोब बंगालमधील अनेक खासदार आणि आमदारांनी भाजपकडे जाण्याचा मोर्चा वळवला. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांची तर अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींची भेट घेतली. या भेटींमध्ये काँग्रेसने तृणमूलला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चा होत्या. याच सर्व घडामोडींच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तृणमूल काँग्रेसची परिस्थिती पाहून सावध पावले घेत काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचे समजते.
तृणमूल काँग्रेसमधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, काँग्रेस मधूनच वेगळ्या झालेल्या पक्षांनी शरद पवारांच्या नेतृत्वात काँग्रेस सोबत एकत्र यावे. यावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत म्हणाले की, संजय राऊत बरोबर बोलत आहेत. जे पक्ष काँग्रेस मधून वेगळे झाले त्यांनी काँग्रेसमध्ये आले पाहिजे, सगळ्यांनी एकजूट केली पाहिजे. राहुल गांधींना इंडिया आघाडीचे नेते मानले पाहिजे. तर राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहेत. त्यांनी जे सुचवले आहे ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. पुढे काय होते आणि राजकीय घडामोडी कोणती दिशा घेतील, हे भविष्य ठरवेल, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत.