

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) आगामी काळात बिहार, केरळ या राज्यांमध्ये निवडणूक लढवेल. लगेचच राज्यात आणि देशात संघटनात्मक फेरबदल होणार नाहीत मात्र राष्ट्रीय स्तरावर संघटनात्मक विस्तार होणार आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, कार्याध्यक्ष पी. सी. चाको, राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सर्व खासदार आणि आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत देशविघातक शक्तींसोबत आपण लढा दिला पाहिजे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले. या बैठकीबाबत बोलताना पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रासह बिहार, केरळ, मध्य प्रदेश आणि वेगवेगळ्या राज्यातील लोक आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित करण्यात आले. यामध्ये देशातील सामाजिक - राजकीय परिस्थिती संदर्भातला ठराव मांडण्यात आला. देशात द्वेषाचे राजकारण सुरू आहे त्यामुळे देशाची हानी होत आहे, असे या ठरावात म्हटले आहे. राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आव्हाड म्हणाले की, एका काळात शरद पवारांचे ६० पैकी ५६ आमदार सोडून गेले होते मात्र शरद पवार डगमगले नाहीत. ते ५६ लोक पुन्हा कधी निवडून आले नाहीत.
आव्हाड म्हणाले की, आमच्या पक्षातील सर्व आमदार आमच्य सोबतच आहेत. आमच्या लोकांना गळाला लावण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे मात्र तसे होणार नाही. सोलापूरचेही आमदारही आमच्या सोबतच आहेत. औरंगजेब प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, औरंगजेबाची कबर ही आपल्या राजांच्या शौर्याची निशाणी आहे. लाखोंचे सैन्य घेऊन आलेला औरंगजेब ते सैन्य घेऊन परत जाऊ शकला नाही, हा इतिहास आहे. मात्र काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करायची आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मागण्या केल्या जातात. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला आमचा विरोधच आहे, शिवाजी महाराजांची समाधी शोधत असताना मनुवाद्यांनी विरोध केला होता.
छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते. तसे नसते तर मदारी मेहतर, सिद्धी इब्राहिम हे लोक त्यांच्यासोबत नसते. खरा धर्मनिरपेक्ष राजा कसा असतो हे जगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने बघितले. सावरकर, गोळवलकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे लिहिले त्यातून त्यांना काय म्हणायचे होते हे स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राज्यात नेतृत्व जयंत पाटलांकडेच राहणार असल्याचे समजते. पक्षात संघटनात्मक बदलांसंदर्भात चर्चा झाली. महाराष्ट्राबाबत मात्र चर्चा झाली नाही. पक्ष नेतृत्व जयंत पाटील यांच्या कारभारावर समाधानी आहे. त्यामुळे नवे प्रदेशाध्यक्ष कोण या चर्चेला तूर्तास स्वल्पविराम मिळाला.