

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, समीर भुजबळ यांचा समावेश होता. पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्याशिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.
या बैठकीत राज्याच्या विविध विषयांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत घडामोडींवर चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये पक्षात वरिष्ठ नेत्यांना योग्य वागणूक दिली जात नाही, महत्वाचे निर्णय परस्पर घेतले जातात, अशी तक्रार देखील करण्यात आल्याचे समजते. पक्षाच्या वतीने मात्र ही नियोजित भेट होती आणि पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी या भेटीसाठी अमित शाह यांच्याकडे वेळ मागितला होता, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
म्हणून चर्चांना उधाण!
सुरुवातीला सुनेत्रा पवार एनडीएमधील वरिष्ठांची भेट घेत असताना त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे असायचे. नंतर काही वेळा सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यासह भेट घेतली. त्यानंतर पक्षातील काही प्रमुख पदांवर नेमणूका करण्यात आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार या नेमणुका करताना पक्षातील वरिष्ठांना विश्वासात घेतले नाही त्यामुळे त्यांच्या मनात खदखद आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्यासोबत पक्षातील कार्यपद्धतीवरही चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे निकाल लागल्यानंतर प्रफुल पटेल यांनी निवडणुकांमध्ये साधण्यात न आलेला समन्वय याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती आणि परीक्षणाचा सल्ला दिला होता.
अलीकडे झालेल्या नियुक्त्या
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात गेल्या काही दिवसांमध्ये युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्षपद, विद्यार्थी, युवती, महिला प्रदेशाध्यक्ष पद, विद्यार्थी आघाडी राष्ट्रीय अध्यक्षपद तसेच नुकतेच मुख्य प्रवक्ता पदी उमेश पाटील आणि मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी यांची निवड झाली.
माजी मंत्री होणार मंत्री?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याचे राज्य मंत्रिमंडळात लवकरच पुनरागमन होण्याची शक्यता आहे. या संदर्भातही अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने संबंधित माजी मंत्र्याच्या पुनरागमनाला हिरवा कंदील दिल्यानंतर त्यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्याचे समजते. संबंधित नेत्यांना मंत्रिपद दिल्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त खात्यांपैकी एका खात्याची जबाबदारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या या भेटीनंतर राज्य मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चांना वेग आला आहे.