पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते नायब सिंह सैनी (Nayab Singh Saini) १७ ऑक्टोबर रोजी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत. सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत (Haryana Assembly elections) सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली आहे.
पंचकुला येथील परेड मैदानावर सकाळी १० वाजता भाजप सरकारचा शपथविधी सोहळा होईल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या शपथविधी सोहळ्यापूर्वी बैठक होईल. त्यात सैनी यांची औपचारिकपणे भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांनी १० सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष पंचकुला जिल्हा आयुक्त असणार आहेत.
भाजपने निवडणुकीदरम्यान संकेत दिले होते की जर भाजपला हरियाणात यश मिळाल्यास नायब सिंह सैनी यांना सर्वोच्च पदी संधी दिली होईल. नायब सिंह सैनी हे ओबीसी समाजातील नेते आहे. ओबीसी ही हरियाणात मोठी व्होटबँक आहे.
माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निकटवर्ती अशी ओळख असणार्या नायब सैनी यांचा जन्म २५ जानेवारी १९७० रोजी अंबाला येथील मिर्झापूर माजरा गावात झाला. बीए. एलएलबी असे त्यांचे शिक्षण झाले आहे. सैनी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ओबीसी समाजातील नेते, अशीही त्यांची ओळख आहे. ते २००२ मध्ये युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हा सरचिटणीस झाले. २००५ मध्ये ते युवा मोर्चा भाजप अंबालाचे जिल्हाध्यक्ष होते. सैनी २००९ मध्ये किसान मोर्चा भाजप हरियाणाचे प्रदेश सरचिटणीसही होते. २०१२ मध्ये ते अंबाला भाजपचे जिल्हाध्यक्ष झाले. २०१४ मध्ये सैनी यांनी नारायणगड विधानसभेतून निवडणूक जिंकली. २०१६ मध्ये त्यांनी हरियाणा सरकारमध्ये मंत्रीपद भूषवले होते. २०१९ लोकसभा निवडणुकीत कुरुक्षेत्र मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांनी १२ मार्च २०२४ रोजी नायब सिंह सैनी यांनी हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. आता ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार आहेत.