

पुढारी ऑनलाईन :
छत्तीसगडच्या अरनपूर क्षेत्रात नक्षल्यांनी आईईडी स्फोट केला. एका जवानाचा पाय आईईडीवर पडल्याने हा स्फोट झाला. या जवानाचे दोन्ही पाय स्फोटात निकामी झाले आहेत. तर एक जवान किरकोळ जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी (दि.९) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले. चकमकीदरम्यान चार जवान गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी दोन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रविवारी सकाळी बिजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना चकमक सुरू झाली. या चकमकीत ३१ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, चकमकीदरम्यान चार सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोन सैनिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दोन जखमी सैनिकांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
यावर्षी १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात वेगवेगळ्या चकमकीत ५० हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. छत्तीसगड पोलिसांच्या माहितीनुसार, राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सुरक्षा दलांनी आतापर्यंत विविध चकमकींमध्ये २१९ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाले आणि विष्णू देव साई मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून, राज्यातील नक्षलविरोधी कारवाईला वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे.