

नवी दिल्ली : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 22 सप्टेंबरपासून 375 वस्तूंवरील जीएसटी दर कमी होणार आहेत. त्यामुळे स्वयंपाकघरातील वस्तूंपासून औषधे, इलेक्ट्रॉनिक्स, गाड्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तू सर्व स्वस्त होणार आहेत. केंद्र आणि राज्यांचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने हा निर्णय घेतला असून ग्राहकांसाठी तो दिलासादायक मानला जात आहे.
तूप, लोणी, पनीर, जॅम, ड्रायफ्रूटस्, आईस्क्रीम यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. औषधे, ग्लुकोमीटर आणि डायग्नॉस्टिक किटस्वरील कर 5 टक्के करण्यात आल्याने आरोग्य सेवेत खर्च कमी होईल. बांधकाम क्षेत्रालाही दिलासा मिळणार असून सिमेंटवरील जीएसटी 28 वरून 18 टक्के करण्यात आला आहे.
लहान गाड्यांवर 18 टक्के आणि मोठ्या गाड्यांवर 28 टक्के कर लागू होणार आहे. अनेक वाहन कंपन्यांनी किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. टीव्ही, एसी, वॉशिंग मशिन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही स्वस्त मिळतील. सलून, ब्युटी पार्लर, फिटनेस सेंटर, योगा सेवा यांवरील जीएसटी 18 टक्केवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
केसांचे तेल, साबण, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी 12-18 टक्के वरून 5 टक्के करण्यात आला आहे. तसेच पावडर, शेव्हिंग क्रीम, आफ्टर-शेव्ह लोशन यांच्याही किमती कमी होतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या सुधारणा अर्थव्यवस्थेत दोन लाख कोटी रुपयांचा प्रवाह निर्माण करतील, असे सांगितले आहे.
या दोन्ही स्लॅबमधील बहुतेक वस्तू आणि सेवा आता 5 टक्के किंवा 18टक्के जीएसटी स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच मुख्य जीएसटी स्लॅब असतील.
40 टक्के विशेष स्लॅब : काही निवडक लक्झरी वस्तू, जसे की सिगारेट, तंबाखू उत्पादने आणि मोठ्या मोटारी, यांच्यावर 40 टक्के विशेष कर आकारला जाईल.