

अहमदाबाद : भारतातील आघाडीची ट्रान्स्पोर्ट युटिलिटी कंपनी अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड) ऑस्ट्रेलियातील त्यांच्या कोळसा निर्यात प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेल्या एनक्यूएक्सटीचे (नॉर्थ क्वीन्सलँड एक्स्पोर्ट टर्मिनल) संचालन करणारी एबॉट पॉईंट पोर्ट होल्डिंग्स पीटीई लिमिटेड (एपीपीएच) ही कंपनी अधिग्रहित केली आहे.
ही कंपनी मुळात कार्मिकेल रेल अँड पोर्ट सिंगापूर होल्डिंग पीटीई लिमिटेडच्या (सीआरपीएसएचपीएल) मालकीची होती. अदानी पोर्टस् अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसई झेड) या कंपनीने सीआरपीएसएचपीएलकडून एपीपीएचमधील 100 टक्के हिस्सा विकत घेतला असून त्यासाठी 14.38 कोटी शेअर्स दिले आहेत. हा व्यवहार पूर्णतः नॉन कॅश स्वरूपात झाला आहे.
एकूण 3,975 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर किमतीचा हा करार आहे. एनक्यूएक्सटी हे 50 मिलियन टन कार्गो हाताळण्याची क्षमता असलेले खोल पाण्यातील टर्मिनल आहे. सध्या ते 8 प्रमुख ग्राहकांसोबत दीर्घकालीन ‘टेक अँड पे’ करारावर कार्यरत आहे. या टर्मिनलमधून 15 देशांमध्ये कोळसा निर्यात होतो. फायनान्शियल इयर 2025 मध्ये एनक्यूएक्सटीने 35 मिलियन टन कार्गो हाताळला असून 349 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर उत्पन्न आणि 228 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर कमावले आहेत.
एपीएसईझेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी गुप्ता यांनी सांगितले की, हे अधिग्रहण आमच्या जागतिक विस्तार धोरणात महत्त्वाचे असून, भविष्यात ग्रीन हायड्रोजन यासारख्या पर्यावरणपूरक उपायांसाठी हे टर्मिनल एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. हा व्यवहार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलियाच्या विदेशी गुंतवणूक पुनरावलोकन मंडळ आणि कंपनीच्या शेअरधारकांच्या मंजुरीनंतर पूर्ण होईल.