

नवी दिल्ली/बेंगळूर; वृत्तसंस्था : नासा आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘निसार’ या पृथ्वी निरीक्षण रडार उपग्रहाने आपल्या ग्रहाच्या पृष्ठभागाची पहिली छायाचित्रे पाठवली आहेत. या वर्षाच्या उत्तरार्धात ही संयुक्त मोहीम पूर्ण वैज्ञानिक कार्यान्वयनकडे वाटचाल करत असताना भविष्यात उपलब्ध होणार्या माहितीची ही एक झलक आहे. इस्रोने 30 जुलै रोजी प्रक्षेपित केलेल्या या उपग्रहाची ही छायाचित्रे ‘निसार’ पृथ्वीचे स्कॅनिंग किती अचूकपणे करेल, हे दर्शवतात.
नासाचे कार्यकारी प्रशासक सीन डफी यांनी या सांगितले की, निसारची पहिली चित्रे हे सिद्ध करतात की, जेव्हा आपण नवकल्पना आणि शोधाच्या सामायिक द़ृष्टिकोनासह एकत्र येतो, तेव्हा मोठी उद्दिष्ट्ये साधता येतात. हे ‘गोल्ड स्टँडर्ड सायन्स’ साध्य करण्याच्या नासाच्या ध्येयाचा एक भाग आहे.
ही माहिती आपत्कालीन प्रतिसाद, पायाभूत सुविधांचे निरीक्षण आणि कृषी व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांतील निर्णय घेणार्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. नासाचे सहयोगी प्रशासक अमित क्षत्रिय म्हणाले, आपल्या ग्रहाच्या कार्याबद्दल समजून घेतल्यास आपण चंद्र आणि मंगळाच्या भविष्यातील मानवी मोहिमांसाठी इतर ग्रहांची मॉडेल्स आणि विश्लेषणे तयार करू शकतो.