Naresh Mhaske | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याचे राऊतांचे षडयंत्र, नरेश म्हस्केंच्या आरोपाने खळबळ!

"ठाकरे गटाकडे दुसरे काही नसल्याने आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न, आमच्याकडे ९० टक्के संघटना"
Sanjay Raut / Naresh Mhaske
Sanjay Raut / Naresh Mhaske
Published on
Updated on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पदावरून हटवून स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊत यांनी पवईतील हॉटेलमध्ये शिवसेना आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे काम करत नाहीत, त्यांना विरोध करा आणि मुख्यमंत्रीपदासाठी माझे नाव पुढे करा, असा आग्रह राऊत यांनी धरला होता, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचे एक तरी पत्र दाखवा अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्या, असे आव्हानही त्यांनी राऊत यांना दिले.

नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हस्के यांनी राऊत यांच्यावर अनेक आरोप केले. राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यास झालेल्या विलंबामुळे राऊत संतप्त झाले होते. त्यातून त्यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबाबत अपशब्द वापरल्याचा दावा म्हस्के यांनी केला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्यासाठी राऊत यांनीच षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sanjay Raut / Naresh Mhaske
Shiv Sena Symbol Case: कपिल सिब्बलांनी निवडणूक आयोगाचा गेम केला? 2018ची 'ती' कागदपत्रे चर्चेत, कोर्टात काय घडलं? A to Z माहिती

‘काँग्रेस-राष्ट्रवादीचे मी पाहून घेईन’

पवईतील हॉटेलमध्ये झालेल्या आमदारांच्या बैठकीत राऊत यांनी उद्धव ठाकरे काम करत नाहीत, ते अपयशी ठरले आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवा. काँग्रेस-राष्ट्रवादीचे मी पाहून घेईन, अशी भूमिका मांडल्याचा दावा म्हस्के यांनी केला. राऊतांना पक्ष ताब्यात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता. त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्री होण्याचे खूळ घातले आणि एकसंध पक्षाचे नुकसान केले, अशी टीकाही म्हस्के यांनी केली. आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारा पहिला जिल्हाप्रमुख असल्याचा दावा करताना म्हस्के म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर बोलावले असतानाही आपण शिंदेंसोबतच जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करा, पक्षाला त्यांची गरज आहे, असे आपण ठाकरेंना सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.

सुनावणीनंतर म्हस्केंचा ठाकरे गटावर पलटवार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हस्के यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावरही टीका केली. ठाकरे गटाकडे दुसरे काही नसल्यामुळे ते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष असा वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे म्हस्के म्हणाले. संघटनात्मक पातळीवर आमच्याकडे नेते, उपनेते, सचिव, शाखाप्रमुख आणि संपर्कप्रमुख आहेत.

९० टक्के लोक आमच्याकडे आहेत. संघटनेच्या कष्टाने आणि ताकदीवर आम्ही सर्व निवडणुका जिंकल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू असताना उर्वरित खासदारांच्या चेहऱ्यावरील भावना पाहाव्यात, असा टोला लगावत म्हस्के म्हणाले, ठाकरेंच्या लोकांना खूश करण्यासाठी सिब्बल बोलतील. आमची वेळ येईल, तेव्हा आम्ही आमची बाजू मांडू. तसेच निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने त्यांच्यावर उठसूट आरोप करणे योग्य नाही. आमचा मूळ पक्ष कायम आहे. आमच्या भूमिकेपासून वेगळे झाले ते बाहेर पडले, असेही म्हस्के म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news