पुढारी ऑनलाईन डेस्क
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ८५ वर्षीय स्वयंसेवक नारायणराव दाभाडकर यांच्या निधनानंतर सोशल मीडियात त्यांच्या नातेवाईकांच्या बद्दल आणि त्यांनी एका तरुणाला दिलेल्या ऑक्सिजन बेडवरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. 'नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयातील बेड सोडला' याचबरोबर ऑक्सिजन पातळी कमी असताना डॉक्टरांनी त्यांना घरी कसे सोडले, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. त्यावर दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी, बाबांनी परोपकार केले आणि 'त्याचे' आम्हाला कोणालाही भांडवल करायचे नाही, असे म्हटले आहे.
आसावरी यांनी या पुढे म्हटले आहे आहे की, 'नारायण दाभाडकर यांनी दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयातील बेड सोडला'. 'ऑक्सिजन पातळी कमी असताना डॉक्टरांनी त्यांना घरी कसे सोडले', अशा प्रश्नांसह खूप चर्चा होताना दिसत आहे. मला त्यावर काहीही बोलायचे नाही. दुर्दैव असे की कोरोना काही आमची पाठ सोडेना. त्यामुळे माझे वडील आणि संपूर्ण कुटुंब हे कोरोना बाधित झाले. कोरोनामुळे माझ्या वडिलांची स्थितीही थोडी नाजूक झाली होती. त्यामुळे २१ तारखेला बाबांसाठी बेड मिळावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत होतो. अनेक प्रयत्नानंतर अखेर आम्हाला येथील 'महापालिकेच्या गांधीनगर परिसरातील इंदिरा गांधी रुग्णालयात बाबांसाठी बेड मिळाला. यावेळी डॉक्टरांनी वडिलांना दाखल करून घेत उपचाराची सुरूवात केली. या दरम्यान काही चाचण्याही करण्यात आल्या ज्यात त्यांच्या फुफ्फुसात कोरोनाचा संसर्ग जास्त झाल्याचे समोर आले. तसेच त्यांची ऑक्सिजन पातळी ५५ पर्यंत खाली आली होती. यामुळे त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता.
दरम्यान, रूग्णालयाच्या पोर्चमध्ये एकच कल्लोळ आणि रडण्याचा जोरदार आवाज ऐकू येत होता. आमच्या रूग्णाला वाचवा म्हणून संपूर्ण कुटुंब रडत होते. हे पाहून बाबांचे मन वितळले. आणि ते म्हणाले, डॉक्टरांनी मला सांगितले आहेच. माझी स्थिती ही गंभीर आहे. या आजाराच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटला मी प्रतिसाद देईनच याची क्षक्यता नाही. त्यामुळे मी अजून किती जगणार? हा बेड दुसऱ्या कोणाच्या तरी कामाला येईल. असे म्हणत, त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. बाबांना बाहेरचा आवाज ऐकवत नव्हता. ते आतून गहिवरले होते. त्यावेळी बहिणीने आणि जावई यांनी त्यांना खूप समजवले. पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि मला फोन करण्यास सांगितले. मला फोनवर बाबा म्हणाले, तू काहीही कर पण मला घरी घेऊन चल. मला या रूग्णालयातला बेड अडवून ठेवायचा नाही. आज तरूण व्यक्ती जर वाचेल तर त्याच्या कुटुंबाला आधार होईल. मी ८५ वर्षांचा झालो आहे. मी माझं सारं आयुष्य जगलो आहे. मला बेड सोडायचा आहे.
बाबांचे हे शब्द ऐकून मला एका क्षणासाठी काहीही सुचले नाही. मी त्यांनी आता काय बोलावं हे ही मला कळतं नव्हतं. माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न होता. पण यातही मी, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. बाबा आपण पाच ते सहा तास धावाधाव केल्यानंतर तुमच्या उपचारासाठी बेड मिळाला आहे. आणि आता अशावेळी हा बेड सोडला तर… बाबा तुम्हाला कळतयं का? तुम्ही वाचणार नाही. म्हणून बाबा…
यावर ते म्हणाले, मला याची पर्वा नाही. तर मी घरी येतोय हे ही मला कोणाला सांगायची गरज नाही. यानंतर त्यांनी जावयाला सोबत घेत घरी येण्याची तयारी सुरू केली. यानंतर जावई यांनी डॉक्टर यांना भेटून डिस्चार्ज मागितला. यावर डॉक्टरांनीही बाबांना समजावलं. तुम्हाला खूप प्रयत्नांनी हा बेड मिळाला असून सोडलात तर पुन्हा नाही मिळणार! यावर बाबा ठीक आहे म्हणाले, आम्हाला घरी जायचं आहे. इतकच ते डॉक्टरांना म्हणाले. त्यांनी डॉक्टरांना, बेड का सोडतोय याबाबत कोणतेही कारण दिलं नाही. बेड सोडण्याचे मूळ कारण बाबांनी केवळ मला आणि कुटुंबीयांनाच सांगितले होते. त्याचा उल्लेख दवाखान्यात अन्यत्र कुणाजवळही केला नव्हता. मला घरी जायचेय एवढाच त्यांचा आग्रह होता.
ते बोलले, मी तेथील दृष्य पाहू शकत नव्हतो म्हणून मी बेड सोडला. यानंतर रूग्णवाहिकेतून बाबा घरी आले. यानंतर ते फक्त दीड दिवस आमच्या सोबत राहिले आणि जगाचा निरोप घेतला. बाबांनी परोपकार केले आणि त्याचे आम्हाला कोणालाही भांडवल करायचे नाही. सध्याच्या स्थितीत त्यांनी जे काही केलं तसं कोणी करेल असं ही मला वाटतं नाही. त्याचबरोबर त्यांनी केलेला त्याग हा आमच्यासाठी एक आदर्श आहे. आता बाबा नाहीत पण तो बेड कोणाला मिळाला. बाहेर रडणाऱ्या त्याच व्यक्तीच्या रूग्णाला बेड मिळाला का याबाबत आम्हाला काहीही माहीत नाही.