

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेल्या आठ वर्षीय मादी चित्ता 'नाभा' हिचा आज (दि. १२) मृत्यू झाला. एका आठवड्यापूर्वी 'सॉफ्ट रिलीज बोमा'मध्ये (मुक्त संचार क्षेत्रातील विशेष विभाग) शिकारीच्या प्रयत्नावेळी तिला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आठ वर्षीय मादी चित्ता 'नाभा' ही काही दिवसांपूर्वी 'सॉफ्ट रिलीज बोमा'मध्ये शिकारीच्या प्रयत्नावेळी गंभीर जखमी झाली. तिच्या डाव्या बाजूच्या 'उल्ना' आणि 'फिबुला' या दोन्ही हाडांना फ्रॅक्चर झाले होते, तसेच तिला इतरही जखमा होत्या. एका आठवड्यापासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारांना तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर आज तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल (Post-mortem report) प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि अधिक तपशील समोर येणार आहे."
चित्ता रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट अंतर्गत नामिबियातील ८ मोठे चित्ते (५ मादी आणि ३ नर) १७ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी १२ चित्ते उद्यानात आणण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ४ चित्यांना जंगलात सोडण्यात आले होते. मे २०२३ मध्ये चित्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला कारणे आणि उपाययोजनांचे स्पष्टीकरण देणारे तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते.