नवी दिल्ली
कोलकाता येथील महिला निवासी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर पावले उचलण्यास सुरुवात केली. आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत अशा घटना झाल्यावर ६ तासांत एफआयआर नोंदवावा लागेल. एफआयआर दाखल करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असेल. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
केंद्र सरकारच्या या आदेशानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झाल्यास त्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखांनी तातडीने पोलिसांना देणे बंधनकारक असेल. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने आरोग्य सेवा महासंचालकांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, कर्तव्यावर असताना आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोणतीही घटना घडल्यास त्यास संस्था जबाबदार असेल. याशिवाय ६ तासांच्या आत एफआयआरही दाखल करावा लागणार आहे. तसे न झाल्यास वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रमुखावरही कारवाई होऊ शकते.
कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा संप सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी, या मागणीसाठी डॉक्टर आंदोलन करत आहेत. यासाठी कायदा करण्याची मागणी डॉक्टरांनी यापूर्वीच केली होती. या घटनेनंतर या मागणीला जोर आला आहे. यासाठी डॉक्टरांनी केंद्र सरकार आणि आरोग्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. मात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणताही कायदा आणण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र, आज केंद्र सरकारकडून एफआयआर दाखल करण्याचसंबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे.