

सातारा : जिल्ह्यातील फलटण, महाबळेश्वर वगळता सात नगरपालिका व मेढा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी धूमशान रंगले असून मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील 374 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रचाराची राळ उडवून देणार्या 609 उमेदवारांचे भविष्य मशिनबंद होणार आहे.
जिल्ह्यातील सातारा, वाई, रहिमतपूर, कराड, मलकापूर, म्हसवड, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण या नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीसाठी निवडणुकीचे धूमशान सुरू होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर महाबळेश्वर व फलटण या दोन पालिकांचा पूर्वी जाहीर केलेला कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या सोबतच कराडमधील प्रभाग क्र. 15 ब व मलकापूरमधील 4 अ व 8 अ या दोन प्रभागांची निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. आता सातारा, वाई, रहिमतपूर, म्हसवड, पाचगणी या पाच नगरपालिकांच्या सर्व जागांसाठी तसेच कराड, मलकापूर नगरपालिकांमधील तीन प्रभाग वगळता इतर ठिकाणी मंगळवारी निवडणूक प्रक्रिया होणार आहे.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. तसेच राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या महायुतीचा जिल्ह्यात ब्लास्ट झाल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यातील चार मंत्री आणि पाच आमदार, माजी आमदार तसेच खासदार व माजी खासदारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्याने निवडणुकीत चांगलीच रंगत आली.
ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. शंभूराज देसाई आणि
ना. मकरंद पाटील, ना. जयकुमार गोरे यांनीच एकमेकांना शिंगावर घेतल्याचे निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये पहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या जाहीर सभा जिल्ह्यात ठिकठिकाणी झाल्या.
निवडणुकीच्या मतदानासाठी सोमवारी सर्व कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झाले. मतदान साहित्य नेण्यासाठी 103 वाहने आरक्षित करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी
5.30 वाजेपर्यंत मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर मतदान यंत्रे सील करून ती सुरक्षा व्यवस्थेत मतदान मोजणी केंद्रांवर नेण्यात येणार आहेत.
या पालिकांत नव्याने प्रक्रिया...
फलटण, महाबळेश्वरसह कराडातील 1 आणि मलकापूरच्या दोन जागांसाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. दि. 4 डिसेंबर नंतर जिल्हाधिकारी याबाबत कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करणार आहेत. कराडमधील 15 ब व मलकापूरमधील 4 अ तसेच 8 अ प्रभागातील निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.