

नवी दिल्ली : लोकसभेवर 2014 ते 2024 दरम्यान पुन्हा निवडून आलेल्या 102 खासदारांच्या सरासरी संपत्तीत तब्बल 110 टक्क्यांनी वाढ झाली असून, सातार्यातील भाजपचे खासदार उदयनराजे भोसले हे यामध्ये आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोक्र्रॅटिक रिफॉर्मस्’ अर्थात ‘एडीआर’च्या अहवालानुसार, या खासदारांची सरासरी संपत्ती 2014 मध्ये 15.76 कोटी होती आणि ती 2024 मध्ये वाढून 33.13 कोटी झाली.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 60 कोटी रुपये होती. ती 2024 मध्ये वाढून 223 कोटी रुपये झाली. म्हणजेच 10 वर्षांत त्यांच्या संपत्तीत 268 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, सरासरी संपत्तीत टक्केवारीच्या आधारावर सर्वाधिक वाढ झारखंड या आदिवासीबहुल राज्यातील झारखंड मुक्ती मार्चाच्या बाबतीत नोंदवली गेली आहे. या पक्षाच्या खासदारांच्या संपत्तीत 804 टक्क्यांनी वाढ झाली.
असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली ‘एमआयएम’ दुसर्या स्थानावर असून, या पक्षाच्या खासदारांच्या संपत्तीत 488 टक्के वाढ नोंदवली गेली. तिसर्या स्थानावर बिहारमधील सत्तारूढ जनता दल युनायटेडचे खासदार राहिले. त्यांच्या सरासरी संपत्ती गेल्या दहा वर्षांत 259 टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुजरातच्या जामनगरच्या भाजप खासदार पूनमबेन माडम यांची संपत्ती 2014 मध्ये 17 कोटी रुपये होती. गेल्या दहा वर्षांत हा आकडा 147 कोटी रुपये झाला आहे. त्यांच्या संपत्तीत 747 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांची संपत्ती 178 कोटींवरून वाढून 278 कोटी झाली. तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा यांची संपत्ती 131 कोटींवरून 210 कोटी झाली. म्हणजेच त्यांच्या संपत्ती 78 कोटी रुपयांची वाढ झाली.