

नवी दिल्ली : 'भारत गौरव योजने'अंतर्गत पुण्याहून प्रमुख तीर्थस्थळांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु कराव्यात, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत केली. रेल्वे बजेटवरील चर्चेत कुलकर्णी यांनी नवी दिल्ली - बेंगळुरू आणि नवी दिल्ली - हैदराबाद मार्गावर धावणाऱ्या राजधानी रेल्वे गाड्या दररोज किंवा आठवड्यातून तीन-तीन दिवस पुणेमार्गे वळवल्या जाव्या. पुणे-नाशिक दरम्यान थेट रेल्वे सेवा त्वरित सुरू करावी, अशा मागण्याही केल्या.
खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुण्याहून हजारो भाविक वैष्णोदेवी, तिरुपती, चारधाम, काशी, रामेश्वरम आणि शिर्डी येथे प्रवास करतात. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी नियमित तीर्थयात्रा गाड्या उपलब्ध नाहीत. 'भारत गौरव योजने'अंतर्गत पुण्याहून धार्मिक स्थळांसाठी विशेष गाड्या चालवल्या पाहिजेत.
पुणे हे देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. मात्र, राजधानी, वंदे भारत किंवा तेजस सारख्या हाय स्पीड ट्रेन्स येथून दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद सारख्या प्रमुख महानगरांना उपलब्ध नाहीत. यामुळे व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी आणि प्रवाशांना मोठी गैरसोय होते. सध्या नवी दिल्ली ते पुणे दरम्यान सुमारे ३-४ गाड्या धावतात आणि सुमारे १५५० किमी अंतर कापतात. यातील सर्वात वेगवान गाड्या, जसे की झेलम एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस, सुमारे २५ ते २८ तास घेतात. पुण्याहून राजधानी एक्सप्रेस धावत नाही, त्यामुळे प्रवाशांना राजधानी पकडण्यासाठी प्रथम मुंबईला जावे लागते. दिल्ली ही देशाची राजधानी आहे आणि पुणे हे वेगाने वाढणारे महानगर आहे. म्हणूनच राजधानी एक्सप्रेस किंवा वंदे भारत सारख्या हाय स्पीड ट्रेनची नितांत गरज आहे, असे कुलकर्णी म्हणाल्या.
पुणे आणि हैदराबाद हे दोन्ही आयटी आणि ऑटोमोबाईल हब आहेत पण त्यांच्यामध्ये तेजस किंवा वंदे भारत ट्रेन नाही. ज्यामुळे व्यवसाय आणि पर्यटनावर परिणाम होतो. पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख औद्योगिक आणि कृषी केंद्रे आहेत. परंतु त्यांच्यामध्ये थेट रेल्वे सेवा नाही, असेही त्या म्हणाल्या.