

नवी दिल्ली ः सत्ताधाऱ्यांच्या पितृ संघटनेने 50 वर्षे त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही, राष्ट्रगीत गायले नाही. आज तेच वंदे मातरम्चे कौतुक करत आहेत, असा निशाणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर सोमवारी साधला.
वंदे मातरम्वरील संसदेतील चर्चेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी हस्तक्षेप करत अरविंद सावंत यांच्यावर पलटवार केला. खासगी इमारतींवर तिरंगा फडकावला जात नाही, एवढेही त्यांना माहिती नाही. बाळासाहेब ठाकरेंनी जर अरविंद सावंत यांना ऐकले असते, तर त्यांना खूप दु:ख झाले असते, हे त्यांना समजायला हवे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले. त्यावर सावंत यांनी मी सत्य सांगत असल्याचे नमूद केले. डॉ. केशव हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या कोणत्याही पुस्तकात वंदे मातरम्चा उल्लेख असल्यास तो दाखवावा, असे खासदार सावंत सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले.
ज्या मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तिथे लोकांना न्यायाची मागणी करावी लागत आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील बेळगाव-कारवार-निपाणी येथे 60 वर्षांपासून आंदोलन सुरू आहे आणि तेथील नागरिकांना अटक केली जाते. त्यामुळे वंदे मातरम्चा नारा देण्यासाठी आणि आत्मभान ठेवून काम करण्यासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्य आणि आत्मनिर्भरतेची लढाई लढावी लागेल, असे ते म्हणाले. संविधानाच्या ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ला होत आहे. कार्यालयांची नावे बदलून काही होणार नाही, कारण सेवा तीर्थाचे दरवाजे बंद आहेत, असे ते म्हणाले.