बंगळूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी पाकिस्तानला सज्जड इशारा दिला. आम्हाला पाकिस्तानसोबत नेहमीच शांतता हवी आहे. पण पाकिस्तानलाच आमच्यासोबत शांतता नको आहे. जोपर्यंत भारताला त्रास देण्यात पाकिस्तानला समाधान मिळते, तोपर्यंत ते हे करतच राहतील. त्यामुळे त्यांना समजेल अशाच भाषेत उत्तर द्यावे लागेल. प्रत्येक वेळी त्यांना पराभूत करून असे नुकसान पोहोचवावे लागेल. याचा त्यांना कायम पश्चात्ताप होईल, असे सांगत भागवत यांनी पाकिस्तानला 1971 च्या युद्धाची आठवण करून दिली. बंगळूर येथे ‘संघ यात्रा के 100 साल : नए क्षितिज’ या दोन दिवसीय व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी संघाबाबतच्या अनेक आक्षेपांना उत्तरे दिली. संघ नोंदणीकृत नव्हता, तर बंदी कोणावर घातली, असा सवालही त्यांनी काँग्रेसला विचारला.
भागवत यांनी जोर देऊन सांगितले की, भारताच्या अशा सततच्या प्रत्युत्तरामुळे अखेरीस पाकिस्तानला आपला दृष्टिकोन बदलण्यास भाग पडेल. ते म्हणाले, जेव्हा हे सतत घडत राहील, तेव्हा एक दिवस पाकिस्तानला आपली चूक समजेल. त्यांनी हे समजून घ्यावे आणि आमचे शांतताप्रिय शेजारी बनावे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही प्रगती करू व त्यांनाही पुढे नेऊ. संघाच्या नोंदणीवरून आणि कार्यपद्धतीवरून टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सरसंघचालक भागवत यांनी थेट आणि सडेतोड उत्तर दिले. संघ हा व्यक्तींचा समूह म्हणून कायदेशीररीत्या ओळखला जातो. जर संघ अस्तित्वातच नव्हता, तर सरकारने तीनवेळा बंदी नेमकी कोणावर घातली होती, असा सणसणीत सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर भागवत यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, संघाची स्थापना 1925 मध्ये झाली, मग आम्ही ब्रिटिशांकडे नोंदणी करावी अशी तुमची अपेक्षा होती का? स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनेही नोंदणी अनिवार्य केली नाही.
हिंदू असणे : भारतातील सर्व लोक हिंदू आहेत. येथील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चनदेखील एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. कदाचित ते विसरले असतील किंवा विसरले गेले असतील. प्रत्येक व्यक्ती, त्याची जाणीव असो वा नसो, भारतीय संस्कृतीचे पालन करते. म्हणून हिंदू असणे म्हणजे भारताची जबाबदारी घेणे.
जातीयवाद : समाजात जातीयवाद नसून जातीय संभ्रम आहे. सवलती आणि निवडणुकांसाठी जातीयतेचा वापर होतो. जात निर्मूलनाऐवजी जात विसरून जाण्याची गरज आहे.
लव्ह जिहाद :दुसरे काय करतात याचा विचार करण्यापेक्षा आपण काय केले पाहिजे, याचा विचार करा. यावर उपाय म्हणून घरात हिंदू संस्कार रुजवा.
हिंदू राष्ट्र : भारत हिंदू राष्ट्र असणे हे कोणत्याही गोष्टीच्या विरुद्ध नाही. ते आपल्या संविधानाच्या विरुद्ध नाही, तर त्याच्या अनुषंगाने आहे. संघाचे ध्येय समाजाला एकत्र करणे आहे, विभाजित करणे नाही.