

इम्फाळ; वृत्तसंस्था : जगाला टिकवून ठेवण्यासाठी हिंदू समाज केंद्रस्थानी आहे आणि इशारा दिला की, “हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व संपेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रास्वसं) सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
मणिपूर दौर्यावर असताना एका सभेला संबोधित करताना भागवत यांनी हिंदू समाजाला अमर म्हटले आणि म्हणाले की ग्रीस, इजिप्त आणि रोम यांसारख्या प्राचीन संस्कृती नाहीशा झाल्या, तरीही भारत टिकून राहिला आहे. “आपल्या संस्कृतीत असे काहीतरी आहे, ज्यामुळे आपण अजूनही येथे आहोत,” असे ते म्हणाले.
राज्यात जातीय संघर्ष उफाळून आल्यानंतर मणिपूरच्या पहिल्या दौर्यावर असताना भागवत यांनी हिंदू समाजाला धर्माचा जागतिक संरक्षक म्हणून संबोधले. “भारत हे एका अमर संस्कृतीचे नाव आहे. जर हिंदू धर्म नष्ट झाला, तर जगातील संस्कृतीही नष्ट होतील,” असे ते म्हणाले. सरसंघचालकांनी आपल्या पूर्वीच्या मताचा पुनरुच्चार केला की, भारतातील मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे पूर्वज हे हिंदूंप्रमाणेच आहेत आणि पुढे म्हटले की, भारतात कोणीही अ-हिंदू नाही.
राष्ट्र उभारणीच्या विषयावर बोलताना, भागवत यांनी आर्थिक आत्मनिर्भरता, लष्करी क्षमता आणि ज्ञानाच्या माध्यमातून सामर्थ्य मिळवण्याच्या गरजेवर भर दिला. “सामर्थ्य म्हणजे आर्थिक क्षमता. आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही अवलंबून राहता कामा नये,” असे ते म्हणाले.