

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तथ्यांच्या आधारे चर्चा व्हावी, धारणांच्या आधारे नाही", असे म्हणत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघावर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांना उत्तर दिले. तसेच संघाचे एकमेव उद्दिष्ट "भारत माता की जय" आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने दिल्लीत आयोजित "संघ यात्रेची १०० वर्षे: नवीन क्षितिज" या कार्यक्रमात ते बोलत होते. ३ दिवस हा कार्यक्रम चालणार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) सतत हल्ला चढवत आहेत. प्रत्येक व्यासपीठावरून संघावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडत नाहीत. त्यांच्या याच आरोपांना सरसंघचालकानी नाव न घेता प्रत्युत्तर दिले.
मोहन भागवत म्हणाले की, संघाबद्दल कायम चर्चा सुरूच असते, मात्र या चर्चा चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीवर आधारित आहेत. अशा परिस्थितीत, संघाबद्दल अचूक आणि खरी माहिती देणे आवश्यक होते. योग्य माहिती मिळाल्यानंतर, श्रोत्याने कोणता निष्कर्ष काढायचा हे ठरवावे. आमचा उद्देश संघाबद्दल कोणालाही पटवून देणे नाही, तर योग्य माहिती देणे आहे. शताब्दी समारंभामुळे हा विचार पुन्हा आला आहे जेणेकरून कार्यक्रमानंतर लोक त्याबद्दल प्रश्न विचारू शकतील. संघ हा एक विषय आहे, त्याबद्दल प्रत्येक वेळी सांगण्यासारखे काही नाही. भविष्यात आपण संघाला कसे पाहतो यावर चर्चा व्हावी, यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. म्हणूनच याला 'संघ यात्रेची १०० वर्षे, नवीन क्षितिज' असे नाव देण्यात आले आहे.
मोहन भागवत म्हणाले की, संघाचा प्रवास १०० वर्षे पूर्ण करत आहे. असे नाही की संघ चालवायचा आहे, म्हणून हा प्रवास आहे. हे खरे आहे की त्याचा उद्देश 'भारत माता की जय' आहे. हा आपला देश आहे, त्या देशाचे कौतुक केले पाहिजे, त्या देशाला जगात स्थान मिळाले पाहिजे. मानवता एक आहे, संपूर्ण जगाचे जीवन एक आहे, तरीही ते एकसारखे नाही. त्याचे रंग आणि रूप देखील वेगवेगळे आहेत, ज्यामुळे जगाचे सौंदर्य वाढले आहे. जगाच्या इतिहासावर नजर टाकली तर स्वामी विवेकानंदांचे हे विधान लक्षात येते की प्रत्येक राष्ट्राचे जगासाठी काही ना काही योगदान असते, जे त्याला वेळोवेळी करावे लागते. संघाचा उद्देश भारत आहे. संघाचे महत्त्व भारताला जागतिक नेता बनविण्यात आहे, कारण जगात भारताचे महत्त्वाचे योगदान आहे. इतिहासात भारत वैभवाच्या शिखरावर होता आणि स्वतंत्र होता. नंतर आक्रमणे झाली, दोनदा गुलामगिरीचा सामना केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. गुलामगिरीतून मुक्त होणे हे पहिले उद्दिष्ट होते, आता जर आपल्याला आपला देश मोठा करायचा असेल तर आपल्याला आणखी मोठे व्हावे लागेल.
भागवत म्हणाले की, संघाचा उद्देश संपूर्ण भारतातील सर्वांना संघटित करणे आहे. आजपासून ३०-४० वर्षांपूर्वी बरेच लोक संघाच्या विरोधात असत, मात्र त्यापैकी बरेच जण आज संघाचे समर्थक बनले आहेत. संघावर टीका करणार्यांना उद्देशून ते म्हणाले की, जे कट्टर विरोधक होते ते तेव्हाही आपले होते आणि जे आज आपल्यासोबत आहेत तेही आपले आहेत. १४२ कोटी लोकसंख्या असलेला आपला देश आहे. त्यात अनेक मते आणि विचार असू शकतात, असे असणे हा गुन्हा नाही. जर वेगवेगळ्या विचारांमधून एकमत झाले तर त्यातून प्रगती होते आणि संघाचे काम संपूर्ण समाजाचे संघटन करणे आहे, असेही ते म्हणाले.