

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील सोहाना गावात शनिवारी (दि.21) कोसळलेल्या चार मजली इमारतीच्या ढिगाऱ्यातून वाचवण्यात आलेल्या हिमाचल प्रदेशातील एका 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. प्रभारी उपायुक्त विराज एस तिडके यांनी सांगितले की, थिओग येथील रहिवासी दृष्टी वर्मा यांना गंभीर अवस्थेत ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आणि सोहाना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जखमी झाल्याने वर्मा यांचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी एक बहुमजली इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली किमान पाच जण अडकले होते. आता मृतांचा आकडा वाढून 2 वर पोहचला आहे.
मोहालीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) दीपक पारीक यांनी सांगितले की, पोलिसांनी इमारत मालक परविंदर सिंग आणि गगनदीप सिंग यांच्याविरुद्ध सोहाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून ढिगारा हटवण्यासाठी अनेक उत्खनन यंत्रे तैनात करण्यात आली आहेत.
अधिका-यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथक हे ऑपरेशन करत आहे. रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत. तिडके म्हणाले की, आपल्या कुटुंबातील सदस्य ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वाटल्यास त्यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०१७२-२२१९५०६ या क्रमांकावर संपर्क साधावा. ते म्हणाले की शहरातील सर्व प्रमुख रुग्णालये, जसे की सिव्हिल हॉस्पिटल (मेडिकल कॉलेजशी संलग्न), फोर्टिस, मॅक्स आणि सोहाना यांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ते म्हणाले की, एनडीआरएफ आणि लष्कराने आणलेल्या उपकरणांव्यतिरिक्त, बचाव कर्मचाऱ्यांना आवश्यक उपकरणे आणि यंत्रसामग्री देखील पुरविण्यात आली आहे.
तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, मोहालीच्या साहिबजादा अजित सिंह नगरमधील सोहानाजवळ एक बहुमजली इमारत कोसळल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. संपूर्ण प्रशासन आणि इतर बचाव पथके घटनास्थळी तैनात आहेत. मी प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. त्यांनी 'एक्स' वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही प्रार्थना करतो की कोणतीही जीवितहानी होऊ नये, आम्ही दोषींवर देखील कारवाई करू. प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मी जनतेला करतो. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी सांगितले की, बचाव कार्यात विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. ते म्हणाले की, लष्कर, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि पोलिस बचाव कार्यात सहभागी आहेत.
इमारत कोसळली तेव्हा मोठा आवाज झाल्याचे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले. जवळच्या प्लॉटमध्ये खोदकाम सुरू असल्याने ही इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तपासानुसार, या इमारतीत एक व्यायामशाळाही होती, जिथे तरुणांची ये-जा असते. जिमच्या एका सदस्याने सांगितले की, कामामुळे ती शनिवारी जिममध्ये जाऊ शकली नाही, त्यामुळे ती अपघाताची शिकार होण्यापासून वाचली. आनंदपूर साहिबचे खासदार मलविंदर सिंग कांग आणि मोहालीचे आमदार कुलवंत सिंग आणि इतरही घटनास्थळी पोहोचले आहेत. सिंग म्हणाले की, ही दुर्दैवी घटना आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे.