

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बटेंगे तो कटेंगे हा संदेश इंडिया आघाडीलाही आहे. आम्ही लोकसभेत आघाडी म्हणून एकत्र लढलो. मात्र, राज्यांच्या निवडणुकांमध्ये आघाडीचे गणित जमू शकले नाही, अशी खंत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी दिल्लीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. इंडिया आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ आहे. मात्र, त्यांनी केवळ जागावाटपात मोठ्या भावाची भूमिका घेऊ नये, तर घटकपक्षांमध्ये समन्वय साधण्याची भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेला आघाडीतला प्रत्येक घटक एकमेकांसाठी काम करत होतो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, केरळ या राज्यांमध्ये आम्ही सोबत लढलो. मात्र, त्यानंतरच्या राज्यांतील निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे गणित जमू शकले नाही. महाराष्ट्रात सुद्धा जमले नाही दिल्लीत जमले नाही उद्या भविष्यात इतर काही निवडणुका आहेत, असे ते म्हणाले. राज्य हे आम्ही भाजपच्या हातात द्यायची का? राज्य जर भाजपच्या हातात गेली तर भविष्यात लोकसभा कशी लढणार? असे सवाल त्यांनी केले. लोकसभेत आम्हाला चांगला निकाल मिळाला. इंडिया आघाडीच्या सातत्याने बैठका-चर्चा होत होत्या, एकमेकांशी संवाद सुरु होता, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. आम आदमी पक्षाला ज्या मतदारसंघात यश मिळते तिथे मतदारयादीतून हजारो नाव गाळले गेले. केजरीवाल यांच्या मतदारसंघातून ३१ हजार नावे गाळली गेली. या सगळ्यांशी एकत्रित मुकाबला करणे गरजेचे आहे इंडिया आघाडी फक्त निवडणुकीपूर्ती आहे का असा प्रश्न जनता विचारते. निवडणुकीत जय- पराजय होतो, इंडिया आघाडीने अनेक प्रश्नांवर एकत्रित येणे गरजेचे आहे. लोकांच्या भावना अशा आहेत की, निवडणुकीच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही एकत्र आले पाहिजे.
विरोधी पक्षाचे कर्तव्य विधानसभा आणि संसदेत नाही, तर रस्त्यावर सुद्धा आहे. इंडिया आघाडी फक्त संसदेमध्ये दिसते. संसदेच्या बाहेर येणे अगोदर गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, शरद पवार, तेजस्वी यादव, फारुख अब्दुल्ला या प्रत्येक नेत्याला वाटते की, इंडिया आघाडी मजबूत टिकली पाहिजे, असे राऊत म्हणाले.