

नवी दिल्ली; पीटीआय : काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 13) मणिपूर दौर्यावर जाणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनी शुक्रवारी याची अधिकृत माहिती दिली. पंतप्रधान कार्यालयानेही या दौर्याला दुजोरा दिला आहे.
पंतप्रधानांची ही भेट विशेष महत्त्वाची मानली जाते. दोन वर्षांपूर्वी मैतेई व कुकी-झो समुदायांमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारानंतर मोदी यांचा हा मणिपूरमधील पहिलाच दौरा आहे. या हिंसाचारात किमान 260 लोकांचा बळी गेला होता, तर हजारो लोकांना घरदार सोडून विस्थापित व्हावे लागले होते.
चुराचांदपूर येथे पंतप्रधान मोदी 7,300 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यामध्ये 3,600 कोटींचा मणिपूर अर्बन रोडस्, ड्रेनेज आणि अॅसेट मॅनेजमेंट प्रकल्प, 2,500 कोटींचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प, मणिपूर इन्फोटेक डेव्हलपमेंट प्रकल्प, तसेच कामगार महिलांसाठी वसतिगृहे यांचा समावेश आहे. इंफाळमध्ये पंतप्रधान मंत्रिपुख्री येथील सिव्हिल सचिवालय, आयटी एसईझेड इमारत, नवीन पोलिस मुख्यालय, तसेच दिल्ली व कोलकाता येथील मणिपूर भवनांचे उद्घाटन करतील.
काँग्रेस नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींच्या दौर्याचे स्वागत केले; मात्र उशिरा घेतलेला निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूरचा प्रश्न खूप काळापासून चालू आहे, त्यांनी आधीच जायला हवे होते. आता ते जात आहेत, हे चांगले आहे; पण देशातील खरा मुद्दा म्हणजे ‘व्होटचोरी’ आहे, असे ते म्हणाले.