

पूर्णिया (बिहार); पीटीआय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील एका सभेत बोलताना काँग्रेस आणि राजदच्या महाआघाडीवर बिडी-बिहार वादासंदर्भात जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या केरळ युनिटने केलेल्या आणि आता हटवलेल्या त्या सोशल मीडिया पोस्टचा उल्लेख केला, ज्यात बिहारसाठी बिडी अशी तुलना करण्यात आली होती.
मोदी म्हणाले, जेव्हा जेव्हा बिहार प्रगती करतो, तेव्हा हे लोक बिहारचा अपमान करण्यात व्यस्त राहतात. तुम्ही पाहिले असेल की, राजदच्या मित्र पक्ष काँग्रेसने बिहारची बिडीशी तुलना करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या लोकांना बिहारबद्दल इतका द्वेष आहे. संबंधित पोस्ट जीएसटी सुसूत्रीकरणावर टोला म्हणून करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णिया येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन व पायाभरणीवेळी संबोधित करत होते. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि इतर स्थानिक नेते उपस्थित होते. मोदी पुढे म्हणाले, या लोकांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या माध्यमातून बिहारच्या प्रतिमेला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवली आहे. ‘बिडी’वरून केलेल्या टिप्पणीस त्यांनी राज्य आणि येथील जनतेचा घोर अपमान, असे संबोधले आणि सांगितले, बिहार येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला चोख उत्तर देईल. राजद आणि काँग्रेसच्या कुशासनामुळे बिहारला गेल्या अनेक वर्षांमध्ये मोठा त्रास झाला आहे.