

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट तीव्र होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आणि पारंपरिक भारतीय पेयांचा आहारात समावेश करण्याचे आवाहन केले आहे. रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 134 व्या भागात त्यांनी नागरिकांना पुरेसे पाणी पिणे, सरकारी सूचनांचे पालन करणे आणि उष्णतेपासून बचावासाठी देशी उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला.
मोदी म्हणाले, देशाच्या बहुतांश भागांमध्ये सध्या प्रचंड उष्णता आहे. पाणी पीत राहा, शरीर हायड्रेट ठेवा आणि उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती खबरदारी घ्या. सरकारी विभागांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. उत्तर भारतातील कैरीचे पन्हं, पंजाब-हरियाणातील लस्सी, राजस्थान-गुजरातमधील ताक, बिहार-झारखंडमधील सत्तूचे सरबत, कोकण आणि गोव्यातील कोकम सरबत, दक्षिण भारतातील पानकम आणि सम्बारम तसेच ओडिशातील बेल पना ही पेये केवळ तहान भागवणारी नसून, स्थानिक संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. उन्हाळ्यात या देशी पेयांचा आस्वाद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
गुरिंदरवीर सिंह याने फेडरेशन कप राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत 10.09 सेकंदांत शर्यत पूर्ण करून भारतातील सर्वात वेगवान धावपटू होण्याचा मान मिळवला. त्यावर अवघ्या दोन दिवसांत पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या राष्ट्रीय विक्रमात तीन वेळा बदल झाल्याचे मोदी यांनी सांगितले. देशभरात खगोलशास्त्राविषयी वाढत असलेल्या आकर्षणाचाही मोदींनी उल्लेख केला. भारतात पंचांग, सण-उत्सव आणि नौकानयन यांचा संबंध प्राचीन काळापासून आकाश निरीक्षणाशी राहिल्याचे सांगत बंगळूर अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीसह विविध संस्थांकडून आयोजित खगोल निरीक्षण सत्रांचे त्यांनी कौतुक केले. ‘खगोल मंडळ’ या गटाने सुरू केलेल्या 30 तासांच्या अभिनव अभ्यासक्रमाचाही त्यांनी उल्लेख केला. केरळ आणि गुजरातमध्येही असे कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी सांगितले.
नेदरलँडस्मधून हजार वर्षे जुने ताम्रपट आणले
नेदरलँडस् दौर्यात भारताला परत मिळालेल्या चोलकालीन ताम्रपटांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. या संचामध्ये 21 मोठे आणि तीन लहान ताम्रपट आहेत. हे ताम्रपट चोल कालीन असून, त्यात एका बौद्ध विहाराला गाव दान दिल्याचा उल्लेख आहे. हे ताम्रपट हजार वर्षांहून अधिक जुने असून, ते प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत, असे मोदी म्हणाले.
आंब्याच्या विविध जातींचे कौतुक
मोदींनी महाराष्ट्रातील हापूस, गुजरातचा केसर, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि लंगडा, दक्षिण भारतातील बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम आणि मलगोवा, तसेच पश्चिम बंगालचा हिमसागर आणि ओडिशा-आंध्र प्रदेशातील सुवर्णरेखा या आंब्याच्या जातींचे त्यांनी कौतुक केले. आंबा उत्पादक शेतकर्यांचे भारतीय कृषी अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे, असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी उभारले 40 लाख रुपये
तामिळनाडूतील नागरकोइल येथे शिक्षिका गिरिजा अम्मा यांनी आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दररोज एक रुपया सैनिकांसाठी जमा करण्याचे आवाहन केले होते. यातून वर्षभरात सुमारे 40 लाख रुपये जमा झाले. हा निधी सैनिकांच्या सेवेसाठी समर्पित केल्याचे मोदींनी सांगितले.